पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडू लागले, महागाई वाढल्याने सामान्य हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:38 AM2021-07-07T04:38:02+5:302021-07-07T04:38:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या काळात सर्वत्र बंदी असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उसळी घेतली आहे. पेट्रोलने शंभरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाच्या काळात सर्वत्र बंदी असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उसळी घेतली आहे. पेट्रोलने शंभरी तर डिझेलने नव्वदी ओलांडली आहे. सध्या सर्व व्यवसाय, उद्योग पूर्व क्षमतेने सुरू नाहीत. काहींवर अजूनही बेकारीची टांगती तलवार आहे. सामान्य माणसाचा रोजगारही थांबला आहे. अशातच इंधन दरवाढीमुळे किराणा, भाजीपाला यांची वाहतूकही महागली. त्यामुळे सामान्य नागरिकाचे दैनंदिन जीवनातील व्यवहारही कोलमडले आहेत.
कोरोनाने गेल्या दीड वर्षापासून सगळे आर्थिक व्यवहार ठप्प केले आहेत. कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढू लागताच जिल्ह्यासह देशभरात लाॅकडाऊन सुरू झाले. पहिल्या लाटेत जवळजवळ आठ महिने सर्व व्यवहार थांबलेले असल्याने अनेकांचे उद्योग, व्यवसाय बुडाले, कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. सारेच आर्थिक व्यवहार थांबलेले असतानाच, लोकांचे रोजगार बुडालेले असतानाच पेट्रोल - डिझेल दरवाढीचा भडका उडू लागला. या काळात सुरूवातीला तर चार महिने सर्वच जिल्ह्यांतर्गत वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, मे २०२०मध्ये अनलाॅक होताच या इंधनांचे दर वाढू लागले. आतापर्यंत पेट्रोलने शंभरी तर डिझेलने नव्वदी ओलांडली आहे. याचा परिणाम डाळी, तेले तसेच अन्य खाद्यपदार्थ आणि भाज्यांची वाहतूक करण्यावर झाला आहे. या चढ्या दरामुळे आता वाहतुकीचे भाडेही वाढले आहे. त्यामुळे मंदीच्या काळातही लोकांना चढ्या दराने किराणा आणि विविध भाज्या खरेदी कराव्या लागत असल्याने गृहिणींचे आर्थिक गणित काेलमडले आहे.
एकंदरीत या सर्व इंधन दरवाढीने महागाई वाढू लागल्याने सामान्य माणूस त्रस्त होऊ लागला आहे.
शेतीही महागली...
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा परिणाम शेती क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कोकणात ट्रॅक्टरऐवजी पाॅवर टिलरने शेती करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, पेट्रोल महागल्याने ही शेतीही महागली आहे. खते, बियाणे यांच्या वाहतुकीचे भाडे वाढले, त्यामुळे खते, बियाण्यांचे दरही वाढले. वाहतूक खर्च वाढल्याने शेती अवजारांच्या किमतीतही वाढ झाली आहे.
व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया
लाॅकडाऊनचा फटका सर्वच व्यवसायांना बसला आहे. त्यातच पेट्रोल, डिझेल वाढल्याने वाहतुकीचे भाडेही आता वाढीव दराने घेत आहेत. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरवाढीवर झाला आहे. भाज्या महागल्या, त्यातच आता पुन्हा लाॅकडाऊन झाल्याने दुपारी ४ वाजेपर्यंतच व्यवसाय होतो. त्यामुळे भाज्यांचेही नुकसान होत आहे.
- शशिकांत लोखंडे, भाजी विक्रेता, रत्नागिरी
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने वाहतूकदारांचे भाडेही वाढले आहे. त्यामुळे आता डाळी, तेले यांचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर अन्य किराणा वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. वाहतूक दर वाढले आहेत. त्यातच आता दुकानांची वेळ मर्यादित असल्याने पुरेसा व्यवसाय होत नाही. मात्र, वाहतुकीचे भाडे भरमसाठ द्यावे लागत आहे.
- प्रदीप शिंदे, किराणा दुकानदार, रत्नागिरी
पत्ता कोबी ४० रुपये किलो
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा परिणाम दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक वस्तूंवर होत असून, वाहतूक महागल्याने भाज्यांचे दरही आता वाढू लागले आहेत. कोबी ४० रूपये किलो, मिरची ५० ते ६० रूपये किलो, काेथिंबीर २५ ते ३० रूपये जुडी आणि आले ६० रूपये किलो झाले आहे.
तेल स्वस्त, डाळ महाग
काही दिवसांपूर्वी तेल आणि डाळींचे दर वाढले होते. त्यामुळे तेलाचा दर १८० ते अगदी २०० रूपयांपर्यंत होता.
आता तेलाचा दर सहा ते सात रूपयांनी कमी झाला आहे. मात्र, डाळीेंचे दर अजूनही वाढलेले आहेत.
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा परिणाम वाहतुकीच्या दरावर झाल्याने आता विविध वस्तूंचे दरही वाढले आहेत.
घर चालवताना गृहिणींची कसरत
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊन केले आहे. अनेकांवर रोजगार बुडाल्याने उपाशी राहण्याची वेळ आली असतानाच आता पेट्रोल दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढू लागले आहेत. सर्वत्र महागाई वाढल्याने जगायचे कसे, हा सर्वसामान्य जनतेसमोर प्रश्न उभा राहिला आहे. कडधान्ये, भाजीपाला, धान्य, तेल आदी जीवनावश्यक वस्तूच महाग होत चालल्या आहेत. त्यामुळे जीव मेटाकुटीला आला आहे.
- मेधा डोंगरे, रत्नागिरी
दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. त्यामुळे आता जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतानाही आवाक्याबाहेरचे होत आहे. प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या वस्तूची दरवाढ झाल्याचे वृत्त ऐकू येते, पेपरात वाचनात येते. आधीच कोरोनाने सगळ्या जगावर रोगाचे संकट आणले असतानाच त्यातून जगण्यासाठी आणावे लागणारे पदार्थही भरमसाठ किमतीने आणावे लागतात. यात सामान्यांची कसरत होत आहे. मात्र, त्याचे सरकारला काहीही नाही. या वाढत्या दरावर सरकार कधी नियंत्रण आणणार?
- सुविधा पाटील, रत्नागिरी