दिल्ली ते कन्याकुमारीपर्यंतच्या सेवानिवृत्तांचा रंगला रत्नागिरीत मेळावा
By शोभना कांबळे | Published: June 11, 2024 06:59 PM2024-06-11T18:59:26+5:302024-06-11T19:00:01+5:30
रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा मंगळवारी शहरातील टीआरपी येथील अंबर हाॅलमध्ये रंगला रंगला. दिवसभर झालेल्या ...
रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा मंगळवारी शहरातील टीआरपी येथील अंबर हाॅलमध्ये रंगला रंगला. दिवसभर झालेल्या या मेळाव्यात दिल्ली ते कन्याकुमारीपर्यंतचे ३०० हून अधिक सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त सेक्रेटरी मोतीराम घरबुडे, समिती समन्वयक किसन माने, हेमंत पगारे, एन. ए. मर्चंट, पी. पी. जोशी, विलास यादव, संयोजक सुभाष थरवळ, ए. व्ही. कांबळे आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मेळाव्यानिमित्त रत्नसिंधु या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. विलास यादव व आर. डी. भाटकर यांचा विशेष सत्कार यावेळी केला. रामनाथ बेलवलकर व रा. कृ. वडके यांनी नोकरीतील सुखद आठवणींना उजाळा दिला. अनेक वर्षांनंतर सर्व सेवानिवृत्त भेटल्यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला. स्नेहभोजनाप्रसंगी जुन्या आठवणी जागवल्या.
५ मे २००५ रोजी सुधाकर देवस्थळी यांच्या भक्कम सहकार्याने सा. बां. खाते सेवानिवृत्तांचा स्नेहमेळावा रत्नागिरीत झाला होता. अधीक्षक अभियंत्यांपासून चतुर्थ श्रेणीपर्यंतच्या १२४ सेवानिवृत्तांनी पुनर्भेटीचा आनंद लुटला होता. आज पुन्हा २० वर्षांनंतर हा मेळावा साजरा होतोय. त्यामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, अशी आठवण संयोजन समितीचे प्रमुख सुभाष थरवळ यांनी सांगितली. ४ एप्रिल रोजी काही निवडक सहकाऱ्यांशी व्हॉटसअपच्या माध्यमातून व्यक्त झालो. सर्वांकडून प्रतिसाद मिळाला आणि ५०० सेवानिवृत्तांची यादी तयार करून त्यांचे संपर्क क्रमांक मिळवण्याचे अवघड काम अल्पावधीतच पूर्ण झाले व मेळावा झाला, असे ते म्हणाले.
विजया देव आणि नीलेश पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दुपारनंतर विविध गुणदर्शन कार्यक्रम झाले. यात गाणी, नृत्य, विनोदी चुटके यांचा समावेश होता. संयोजन समितीचे प्रमुख सुभाष थरवळ, प्रभाकर रहाटे, किसन माने, शरद कांबळे, शरद कोतवडेकर, विजय जाधव, राजेंद्र भाटकर, नंदप्रकाश बिर्जे, शिरीष वारंग, अविनाश पाटणकर, सुधाकर बेहेरे, उदय डाफळे, स्मिता बंडबे, संध्या भोसले, विजया देव, संतोष कांबळे यांनी स्नेहमेळावा यशस्वी केला.
८० वर्षांवरील ज्येष्ठांचा सन्मान
या वेळी ८० वर्षांवरील रामनाथ बेलवलकर, रामचंद्र वडके, विठ्ठल डांगे, दत्तात्रेय नलावडे, सुधाकर देवस्थळी, सुरेश लिमये, श्रीनिवास गोरे, अविनाश त्रिंबको, सदानंद भावे, हरिश्चंद्र हातिसकर, सुभाष थरवळ, सुषमा थरवळ, प्रभुसिंग जमादार, तुळशीदास शेट्ये, पुंडलिक राणे या ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला.