महाशस्त्रक्रिया शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:15+5:302021-07-11T04:22:15+5:30
कोळवणकर यांची निवड खेड : भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित ज्ञानदीप विद्यामंदिरचा माजी विद्यार्थी कौस्तुभ कोळवणकर यांची ...
कोळवणकर यांची निवड
खेड : भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित ज्ञानदीप विद्यामंदिरचा माजी विद्यार्थी कौस्तुभ कोळवणकर यांची मुंबई येथील नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रेडियोलॉजिस्ट प्रशासक म्हणून निवड झाली आहे. प्रशालेत त्यांनी अकरावी, बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
४० प्रकल्पांना परवानगी
रत्नागिरी : सागरी मत्स्याेत्पादनात दिवसेंदिवस घट होत असल्याने, कोळंबीसह गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाला चालना देण्यास सुरुवात झाली आहे. कोळंबी मत्स्य संवर्धन प्रकल्पाकडे कल वाढू लागला असून, जिल्ह्यात ४० प्रकल्पांना परवानगी दिली आहे. वर्षातून साधारणत: १०० टनाहून अधिक उत्पादन काढले जात आहे.
पाणीपुरवठ्यासाठी सर्वेक्षण
दापोली : पंचनदी धरणातून ओणी, ओणनवसे, भाटी, नवसे, उसगाव, देरदे, उंबरघर या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पुरवठा योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेच्या सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना कार्यान्वित होणार आहे.
सोमवारी आढावा बैठक
रत्नागिरी : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध केंद्रशासन, राज्यशासन व जिल्हा परिषदेकडील योजनांची उद्दिष्टपूर्ती वेळीच व प्रभावीरीत्या होण्यासाठी सोमवार दिनांक १२ रोजी दुपारी २ वाजता शामराव पेजे सभागृहात तालुकास्तरावरील प्रलंबित विषयांबाबत विशेष समन्वयक सभा आयोजित केली आहे.
स्थापना दिवस साजरा
रत्नागिरी : तालुक्यातील बसणी येथील जी.एम. शेट्ये हायस्कूलचा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थापक कै.गणपतराव शेट्ये यांच्या पुतळ्यास अध्यक्ष अॅड.भाऊ शेट्ये यांनी पुष्पहार अर्पण केला. रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउनने सामाजिक बांधिलकी जपत हायस्कूलसाठी लॅपटॉप भेट दिला आहे.
शरीफा खान यांचा सत्कार
खेड : तालुक्यातील पन्हाळजे येथील पोस्टमास्तर शरिफा खान यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा पोस्ट कार्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. २८ वर्षांच्या सेवेनंतर त्या सेवानिवृत्त झाल्याने त्यांना गौरविण्यात आले. यावेळी नजिर खान, अकबर खान, युसूफ खान, व्ही.आर. कदम, श्रीकांत भोसले उपस्थित होते.
बसफेरीची मागणी
चिपळूण : वैद्यकीय उपचारासाठी मिरज शहर सोईस्कर असल्याने, शहरातील गोवळकोट धक्का ते मिरज एसटी फेरी सुरू करावी, अशी मागणी अॅड. ओवेस पेचकर यांनी केली आहे. आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
तहसीलदारांना निवेदन
मंडणगड : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द केलेल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत नुकतेच महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या आदेशानुसार श्री शनिकृपा हितवर्धक समाज संस्थेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मंडल आयोग लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बैठकांचे आयोजन
चिपळूण : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन कार्यकर्त्यांची मते आजमावण्याचा निर्णय राष्ट्रवादी पार्लमेंटरी बोर्डच्या बैठकीत घेण्यात आला. आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम यांच्या मुख्य उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आगामी नगरपरिषद निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.