परशुराम घाटाची भूवैज्ञानिकांकडून पाहणी, दरड कोसळून एकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन झालं जागे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 07:14 PM2022-02-10T19:14:29+5:302022-02-10T19:25:43+5:30
परशुराम घाटात दरड कोसळून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले
चिपळूण : परशुराम घाटात दरड कोसळून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्यानंतर मात्र प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पुणे येथील भूवैज्ञानिकांच्या पथकाने गुरुवारी परशुराम घाटाची पाहणी केल्यानंतर महामार्ग विभागाकडून तांत्रिक माहिती मागितली आहे. तर विशेष म्हणजे येथे १५ फूट उंचीची संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात डोंगर कटाई करताना एका कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षेचा मुद्दा एेरणीवर आला आहे. भविष्यात घाटात चौपदरीकरण करताना जीवितहानी होऊ नये. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने कमालीची खबरदारी बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर घाटाची पाहणी करण्यासाठी पुणे येथून एस. एम. फाऊंडेशन इंडियाच्या भूवैज्ञानिकांतर्फे घाटात पाहणी केली.
यावेळी एम टेक इंजिनिअरिंग जिओ टेक्निशियन विकास माने, मुजुमदार, राष्ट्रीय महामार्ग चिपळूण विभागाचे उपअभियंता प्रकाश निगडे, शाखा अभियंता रॉजर मराठे यांच्यासह ठेकेदार कंपनीचे प्रतिनीधी उपस्थित होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रीय महामार्गाचे माढकर व ठेकेदार कंपनीचे टीम लीडर मनोज कलांगडे हेही उपस्थित होते. त्यांनी दुर्घटनाग्रस्त भाग तसेच संपूर्ण घाट परिसराची पाहणी केली. येथील मातीही परीक्षणासाठी घेण्यात आली.
राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच ठेकेदार कंपनीकडून कामाची माहिती घेतानाच काही तांत्रिक माहिती मागितली आहे. ती माहिती उपलब्ध झाल्यानंतर भूवैज्ञानिक आपला अहवाल संबंधितांना सादर केला जाणार आहे.
घडलेली दरड दुर्घटना व घाटाच्या दोन्ही बाजूला असलेली गावे पाहता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. येथे संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेऊन तात्काळ कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी संरक्षक भिंतीसाठी आखणी करून सायंकाळी प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
किमान ७०० मीटरचे अंतर अत्यंत धोकादायक असून , पहिल्या टप्प्यात ३०० मीटर लांबीची आणि सुमारे १५ फूट उंचीची संरक्षक भिंत येथे उभारली जाणार आहे. त्यामुळे येथील गावे धोकामुक्त होण्याची शक्यता आहे.