Ratnagiri: विकासकामांच्या प्रशासकीय मान्यता लवकर घ्या, पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश
By अरुण आडिवरेकर | Published: July 25, 2024 05:51 PM2024-07-25T17:51:55+5:302024-07-25T17:53:22+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संभाव्य दौऱ्यामध्ये विकासकामांबाबत लोकार्पण, भूमिपूजन करण्यात येणार
रत्नागिरी : जिल्हा नियोजनमधून करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या प्रस्तावाला सर्व यंत्रणांनी लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घ्यावी. त्यानंतर जिल्हा नियोजन कार्यालयाने तातडीने निधी वितरित करावा. हा निधीही वेळेत खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
संभाव्य मुख्यमंत्री दौऱ्याच्या अनुषंगाने पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विकासकामांच्या अनुषंगाने गुरुवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
मंत्री सामंत यांनी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, वयोश्री योजना, तीर्थदर्शन योजना, विमानतळ, प्रांत कार्यालय भूमिपूजन, मिनी थिएटर, लोकमान्य टिळक स्मारक लोकार्पण या याेजनांबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी मंत्री उदय सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मंत्री सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संभाव्य दौऱ्यामध्ये विकासकामांबाबत लोकार्पण, भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी जबाबदारीने आणि गतीने ही कामे मार्गी लावावीत. त्याचबरोबर या सोहळ्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबतही संबंधित यंत्रणेने कार्यवाही पूर्ण करावी.
महसूल सप्ताहात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात मोठा कार्यक्रम घ्यावा. त्यामध्ये लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा. जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाबाबतही सर्व विभाग प्रमुखांनी लवकरात लवकर कार्यवाही पूर्ण करावी, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनीही विविध यंत्रणांकडून कामांबाबतचा आढावा घेतला.