चिपळूणसाठी १५ हजार कोरोनाचे डोस मिळावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:29 AM2021-08-01T04:29:32+5:302021-08-01T04:29:32+5:30
चिपळूण : चिपळुणात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत मदतकार्य करण्यासाठी अनेक संस्थांचे कार्यकर्ते येऊन गेले आहेत. येथील वर्दळ वाढली आहे. यावेळी ...
चिपळूण : चिपळुणात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत मदतकार्य करण्यासाठी अनेक संस्थांचे कार्यकर्ते येऊन गेले आहेत. येथील वर्दळ वाढली आहे. यावेळी मास्क आणि योग्य शारीरिक अंतराचे पालन करणे कुणालाही शक्य झालेले नाही. त्यामुळे या भागात लसीकरण जलदगतीने होणे गरजेचे आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून चिपळूणसाठी १६ हजार कोरोना लस मिळावी, अशा मागणीचे निवेदन येथील आय. एम. ए. संघटनेतर्फे प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.
चिपळूण शहर व पंचक्रोशी परिसरातील लसीकरण केंद्र वाहून गेलं आहे, कोविडचे डोस स्टॉक रेफ्रिजरेशन्स बंद असल्यामुळे वाया गेले आहेत. गेले १० दिवस लसीकरण पूर्णतः ठप्प आहे. महापुरानंतर चिपळूण पंचक्रोशी भागात ९००पेक्षा अधिक वाहने व ४०,०००पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक मदतकार्यासाठी येऊन गेले आहेत. कोविडचा धोका अजूनही कमी झालेला नाही, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा योग्य वापर नसल्यामुळे चिपळूण शहर पंचक्रोशी भागात हा धोका अधिक वेगाने वाढू शकेल. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष बाब म्हणून चिपळूण पंचक्रोशीत कोविड लसीकरणासाठी १५,००० डोसेस मिळावेत, याबाबत चिपळूण शहरातील जनरल प्रॅक्टिशनर व इंडियन मेडिकल असोसिएशन, चिपळूण शाखेच्या सदस्यांमार्फत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शासकीय यंत्रणा अपुरी असल्यामुळे आय. एम. ए., चिपळूण पूर्णतः सहकार्य करून लसीकरण जलदगतीने होण्यासाठी सहकार्य करेल. कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यास पुन्हा प्रशासनावरच ताण येतो. त्यामुळे चिपळूण प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी याबाबत शासनाकडे तातडीने कळवू, असे संघटनेला सांगितले. हे निवेदन देताना आय. एम. ए.चे डाॅ. श्रुतिका कोतकुंडे, डाॅ. गाैरव बारटक्के, सचिव डाॅ. अब्बास जबळे, पंकज दळवी उपस्थित होते. या निवेदनाची प्रत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडेही सादर करण्यात आली आहे.