कारवाई हाेणार नाही ही समजूत मनातून काढून टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:22 AM2021-07-20T04:22:27+5:302021-07-20T04:22:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क असगोली : शासनाच्या नियमानुसार झिरो पेंडींगची अंमलबजावणी मोहीम हाती घेतली आहे. तत्काळ निर्णय घेण्यापूर्वी एक संधी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
असगोली : शासनाच्या नियमानुसार झिरो पेंडींगची अंमलबजावणी मोहीम हाती घेतली आहे. तत्काळ निर्णय घेण्यापूर्वी एक संधी देत आहे. काही ठिकाणी पदे कमी असल्यामुळे कामे झाली नाहीत तर कारवाई होणार नाही ही चुकीची समजूत मनातून काढून टाका. दर आठवड्याला एक तर महिन्याला चार नवीन कामांची अंदाज पत्रके आली पाहिजेत, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केली.
गुहागर पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, गटविकास अधिकारी अमोल भोसले, महेश नाटेकर, नेत्रा ठाकूर, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांसह अधिकारी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, आजपर्यंत मनरेगा अंतर्गत आपण ठरावीक विकास कामे करत होतो. परंतु, यातून अनेक कामे करता येऊ शकतात. गुहागर तालुक्यात कार्य पत्रिका (जाॅबकार्ड) धारक संख्या जास्त आहे. परंतु, त्यातील सक्रिय कमी आहेत. मनरेगाअंतर्गत कामासाठी ठेकेदार पद्धत नसल्याने त्यांना सक्रिय करण्याची गरज आहे. जनजीवन मिशन अंतर्गत ‘अ’ वर्गातील चार पैकी तीन गावांची तर ‘ब’ वर्गातील ११४ पैकी ७२ गावांची अंदाजपत्रके तयार आहेत. उर्वरित गावाची अंदाजपत्रके तयार करून लवकरात लवकर पाठवावीत, अशी सूचना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिल्याचे जाधव यांनी सांगितले.
काेरोनाची दुसरी लाट कमी करण्यासाठी व तिसरी लाट रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच उपाय सुचवावेत. तसेच १ ऑगस्टपासून मच्छिमारी सुरू होईल. तालुक्यात २ हजारपैकी ५४५ जणांचे लसीकरण झाले आहे. ते बाहेर जातील या पूर्वीच नियोजन करून त्यांना प्रामुख्याने लस द्यावी, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याला आलेला निधी परत जाता कामा नये. प्रत्येक विभागाने आपल्याला आलेल्या निधीचे काम माहिती घेऊन जबाबदारीने पार पाडा. नेहमीप्रमाणे बांधकाम विभागावर घालू नका, अशी सक्त ताकीद विक्रम जाधव यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.
जिल्हाधिकारी यांनी काेरोना तपासणीचे उद्दिष्ट दिले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक गावात तपासणी करा. तालुक्यात २४ आयसोलेटेड असून, तिथे एकही रुग्ण नाही. काेरोना रुग्णाला आपण बाजूला ठेवत नाही, तोपर्यंत काेरोना पसरणे थांबणार नाही. ग्रामकृतीदल, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्यांनी आयसोलेटेड सुरू करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड यांनी दिल्या.