शेतीचे नुकसान करणाऱ्या वानर, माकडांचा बंदोबस्त करा; रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण
By शोभना कांबळे | Published: October 5, 2023 03:36 PM2023-10-05T15:36:43+5:302023-10-05T15:37:52+5:30
रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करणाऱ्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत ...
रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करणाऱ्या वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे राज्यकर्त्यांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अखेर गोळप येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांनी गुरुवार (दि. ५) पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. त्यांंच्या या उपोषणाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला आहे.
शासनाला या प्रश्नाचे गांभीर्य कळावे, यासाठी अविनाश काळे यांनी या मागणीसाठी डिसेंबर २२ मध्ये जिल्ह्यातील ३० पेक्षा अधिक गावांमधील सुमारे २०० शेतकऱ्यांसह लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर २ आॅगस्ट २०२३ रोजी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची महत्त्वाची सभा घेण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासन, वनविभाग यांना प्रत्येक शेतकऱ्याने निवेदन दिले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, परिक्षेत्र वनाधिकारी या सर्वांना वानरांच्या बंदोबस्तासाठी निवेदनेही पाठविण्यात आली. मात्र, याबाबत कुणालाच दखल घेण्याची गरज वाटलेली नाही.
वनखात्याच्या १९२६ या हेल्पलाइनवर शेकडो फोन करूनही प्राणी न्यायला माणसे आलेली नाहीत. वानरांचा कायमचा बंदोबस्त व्हावा. तात्पुरता उपाय म्हणून त्यांना पकडून अभयारण्यात सोडावे. शेती बागायती भयमुक्त करणे शेतकऱ्यांचा हक्क आहे. शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा कोकणातील गावेच्या गावे ओस पडली तर पुढच्या पिढ्या कधीच माफ करणार नाहीत, असा इशाराही काळे यांनी या निवेदनाद्वारे शासनाला दिला आहे.
वानर, माकडांच्या प्रचंड उपद्रवामुळे शेतकरी, बागायतदार आणि नागरिक मेटाकुटीला आले आहेत. वानर, माकडे घरावरील नळे, पत्रे फोडणे, पाईप तोडणे, घरात शिरून नासधूस करणे. माणसांच्या अंगावरही धावून येण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या ३५ वर्षांत वानर, माकडे मारणे बंद झाल्याने त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्याचबरोबर भटकी जनावरे, श्वान यांचाही जीवघेणा उपद्रव वाढला आहे. या समस्यांनी शेतकऱ्यांसह नागरिकही हैराण झाले आहेत. त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी अविनाश काळे यांनी गुरूवारपासून बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रत्यक्ष या उपोषणात सहभागी झाले आहेत.