घाेळ माशामुळे दापाेलीतील मच्छीमार बनला लखपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:38 AM2021-09-08T04:38:04+5:302021-09-08T04:38:04+5:30
दापाेली : पालघर येथील घाेळ माशामुळे मच्छीमार कराेडपती झाल्याची घटना ताजी असतानाच हर्णै (ता. दापाेली) येथील बाेट मालक राउफ ...
दापाेली : पालघर येथील घाेळ माशामुळे मच्छीमार कराेडपती झाल्याची घटना ताजी असतानाच हर्णै (ता. दापाेली) येथील बाेट मालक राउफ हजवाने चक्क लखपती झाले आहेत. या माशाच्या लिलावात दाेन लाखांची बाेली झाली आणि हजवाने एका दिवसात लखपती झाले. हा मासा एम. एम. फिशरीज कंपनीने घेतला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदर (ता. दापाेली) मासेमारी लिलावासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी एका माशाचा लिलाव तब्बल दोन लाख रुपये झाल्याने हे बंदर पुन्हा चर्चेत आले आहे. घाेळ मासा दुर्मीळ असून, ताे सहसा मच्छीमारांच्या जाळ्यात येत नाही; परंतु ज्यांच्या जाळ्यात हा मासा पडेल त्याला तो लखपती बनवल्याशिवाय राहत नाही. याचे मूर्तिमंत उदाहरण हर्णै बंदरात पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी पालघर येथील मच्छीमाराच्या जाळ्यात सापडलेल्या माशाने मच्छीमाराला कराेडपती केले हाेते. तर आता हर्णै येथील बाेट मालकाला लाॅटरी लागली आहे.
-------------------------
औषधी गुणधर्म
घाेळ माशामध्ये औषधी गुणधर्म असतात. तसेच त्याच्या शरीराचा उपयाेग पाइप ऑपरेशनचा दोरा बनवण्यासाठी केला जातो. त्याची किंमत सोन्यापेक्षाही अधिक आहे, त्यामुळे या माशाला बाजारात खूप किंमत असते, असे रउफ हजवाने यांनी सांगितले.