रत्नागिरी जिल्हयात सर्वत्र घटस्थापना, नवरात्रोत्सवास प्रारंभ; ढोल ताशांच्या गजरात दुर्गादेवीच्या मूर्तींचे आगमन
By मेहरून नाकाडे | Published: September 26, 2022 06:57 PM2022-09-26T18:57:36+5:302022-09-26T18:57:59+5:30
सार्वजनिक मंडळांतर्फे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन
रत्नागिरी : सर्वपित्री अमावस्येनंतर आज, सोमवारी जिल्ह्यात पारंपारिक व धार्मिक पध्दतीने घटस्थापना करण्यात आली. कोरोनामुळे असलेले निर्बंध रद्द केल्याने यावर्षी नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिक आहे. ढोल ताशांच्या गजरात दुपारपर्यंत श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचा आगमन सोहळा रंगला. सार्वजनिक मंडळांतर्फे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
पावसानेही विश्रांती घेतल्याने मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. देवीची मूर्ती मिरवणूकीने मंडपात आलेनंतर शास्त्रोक्त व विधिवत पध्दतीने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. देवींच्या मंदिरांना रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली असून सोमवारी सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मंदिरात रांग लागली होती. शहरातील श्री रत्नदूर्ग मंदिरात पहाटेच काही भक्त अनवाणीच दर्शनासाठी पोहोचले होते.
जिल्ह्यात ३९४ सार्वजनिक मंडळांतर्फे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली तसेच ३९ हजार ७७३ खासगी घट बसविण्यात आले आहेत. मातीच्या भांड्यात नऊ प्रकारचे धान्य ठेवण्यात येवून. घटाची दरदिवशी पूजा केली जाणार आहे. नित्य फुलांची माळ अर्पण करण्यात येणार असून सोमवारी पहिली माळ अर्पण करण्यात आली.
फळा, फुलांना मागणी
उत्सवामुळे फुलांना मागणी असून शहरात सकाळपासूनच फुल विक्रेत्यांनी शहरात बस्तान मांडले होते. ३० ते ४० रुपये पाव किलो या दराने फुलांची विक्री सुरू होती. नवरात्रोत्सवात अनेक भाविक उपवास ठेवतात, केवळ फलाहार करीत असल्याने फळांना विशेष मागणी होती.
दांडिया, गरबा रासनृत्यांचे आयोजन
नवरोत्सवात दांडियाला परवानगी असल्याने ठिकठिकाणी दांडिया, गरबा रासनृत्यांचे आयोजन करण्यात आले असून विशेष स्पर्धा आयोजित करून बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
नवरात्रोत्सवात नऊ रंगाना विशेष महत्व आहे. त्यानुसार भाविक वेशभूषा करतात. सोमवारी पांढरा रंग असल्याने अनेक भाविकांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. शासकीय कार्यालये, बॅंका, खासगी कार्यालयातून महिला कर्मचारी पांढऱ्या रंगाच्या साड्या, ड्रेस परिधान करून आल्या होत्या. महिलांबरोबर पुरूषांनीही पांढऱ्या रंगाचे शर्ट, सदरे घातले होते. काही कर्मचारी अनवाणीच कार्यालयात आले होते.