घेरारसाळगड-भराडे धनगरवाडी जोडरस्त्याचा दगडी बांध हटवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:04+5:302021-06-26T04:22:04+5:30
खेड : घेरारसाळगड-भराडेवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर काही पुढाऱ्यांनी दगडी बांध घालून मार्ग अडवला होता. या प्रश्नी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन ...
खेड : घेरारसाळगड-भराडेवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर काही पुढाऱ्यांनी दगडी बांध घालून मार्ग अडवला होता. या प्रश्नी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी रस्त्यावरील दगडी बांध हटवून मार्ग मोकळा करण्याच्या दिलेल्या आदेशानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ही कार्यवाही केली.
ग्रामपंचायत निवडणुकीत धनगर समाजाच्या महिलेने उच्चवर्णीय समाजाविरोधात निवडणूक लढवल्याच्या रागातून काही पुढाऱ्यांनी ७ मार्चपासून भराडे-धनगरवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर दगडी बांध घालून मार्ग अडवला होता. यामुळे धनगरवाडीतील ग्रामस्थांची गैरसोय झाली होती. या प्रश्नी जिल्हाध्यक्ष आखाडे यांनी तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्याकडे पत्रव्यवहार करत रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी घेतलेल्या सुनावणी दरम्यान हा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असल्याने व यापूर्वी शासकीय निधी खर्च झाल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाला रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश तहसीलदार घोरपडे यांनी दिले. त्यानुसार ही कार्यवाही करत मार्ग खुला केल्याने धनगरवाडीतील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.