मुलगी दूर जाऊ नये म्हणून जीवन संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:34 AM2021-05-20T04:34:30+5:302021-05-20T04:34:30+5:30
रत्नागिरी : पत्नीला घटस्फोट हवा होता. तिने घटस्फोट घेतला तर मुलगी आपल्यापासून दूर जाईल, या नैराश्येतून कुवारबाव येथील रोहित ...
रत्नागिरी : पत्नीला घटस्फोट हवा होता. तिने घटस्फोट घेतला तर मुलगी आपल्यापासून दूर जाईल, या नैराश्येतून कुवारबाव येथील रोहित चव्हाण याने आपल्या पत्नीचा खून केला आणि नंतर स्वत:लाही संपवले. रोहितची जी चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे, त्यातून या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.
शहरानजीकच्या कुवारबाव येथे मंगळवारी पहाटे पती-पत्नीचे मृतदेह घरात सापडले होते. पत्नीचा मृतदेह बेडवर तर पतीचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासणीत घरात एक चिठ्ठी सापडली होती. त्यामध्ये मी तिला मारले व स्वत:ला संपवत आहे, असे लिहिले होते. या चिठ्ठीतून आपल्या आईला मुलीचा सांभाळ करण्याची विनंतीही केली आहे.
प्रेमविवाह केल्यानंतर रोहित व पूजा रत्नागिरीत आले होते. सुरुवातीला मिरजो़ळे पाडावेवाडी येथे भाड्याने खोली घेऊन राहात होते. मुलगी झाल्यानंतर काही दिवसांनी पूजाने रोहितला हातभार लागावा म्हणून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. दोघेही नोकरी करत असल्याने त्यांनी कुवारबाव येथे छोटासा फ्लॅट घेतला. गेली दहा वर्ष त्यांचा संसार सुखाने सुरु होता. गेले काही दिवस दोघांमध्ये वाद होत होते. गतवर्षीच्या लॉकडाऊनपासून रोहित घरीच होता. पूजा नोकरी करुन संसार चालवत होती. दोघेही त्यांच्यातील वादाची कुणकुण कोणलाही लागू देत नव्हते.
पूजा रोहितकडे घटस्फोट मागत होती. मात्र रोहितचा लेकीवर, याचनावर खूप जीव होता. पूजाला घटस्फोट दिला तर याचना आपल्यापासून दूर जाईल, या नैराश्येत तो होता. त्यातूनच त्याने पत्नीची हत्या करुन स्वत:ची जीवनयात्रा संपविली, अशी माहिती पुढे येत आहे.
दोघांच्या मृत्यूचे वृत्त समजताच दोघांचेही नातेवाईकांनी बुधवारी पहाटे रत्नागिरीत आले. पूुजाच्या माहेरच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह स्वीकारला, तर रोहितच्या आई, भाऊ यांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. दोघांवर रत्नागिरीतच अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले अधिक तपास करीत आहेत. सद्यस्थितीत आकस्मिक मृत्यू म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. तपासात समोर येणाऱ्या माहितीनंतर त्याचे स्वरुप बदलेल.