प्रजासत्ताकदिनी झालेल्या संचलनात रत्नागिरीच्या कन्यांचा सहभाग
By शोभना कांबळे | Published: February 1, 2024 05:06 PM2024-02-01T17:06:19+5:302024-02-01T17:06:36+5:30
सर्व महिला वादकांच्या पारंपरिक वादनाने प्रजासत्ताक दिनाचे संचलन होण्याचा हा गेल्या ७५ वर्षांतील पहिलाच ऐतिहासिक प्रसंग
शोभना कांबळे
रत्नागिरी : प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर आयोजित करण्यात आलेल्या ७५व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात रत्नागिरी जिल्ह्यातील १९ आणि पुण्यातील १ अशा २० मुली आणि चार मुलांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यात चिपळूण, रत्नागिरी, लांजा, राजापूर, खेड तालुक्यांतील सहभागींचा समावेश होता.
राष्ट्रगीतानंतर प्रजासत्ताक दिनाची परेड भारताच्या विविध राज्यांतील १२ पथकांतील सुमारे ११२ महिलांच्या पारंपारिक वाद्यवादनाने झाली. सर्व महिला वादकांच्या पारंपरिक वादनाने प्रजासत्ताक दिनाचे संचलन होण्याचा हा गेल्या ७५ वर्षांतील पहिलाच ऐतिहासिक प्रसंग होता. यात विघ्नहर्ता आणि जय हनुमान या ढोलपथकांचा समावेश होता. चिपळूणमधील साहील रानडे पथकप्रमुख, तर मुंबईच्या देवेंद्र शेलार या तरुणाने या पथकाचे नेतृत्व केले. यात विघ्नहर्ता ढोलपथकातील ७ मुली आणि ३ मुलगे होते; तर चिपळूणमधील जय हनुमान ढोलपथकामधील २ मुली होत्या. तसेच रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि खेड येथीलही मुली सहभागी झाल्या होत्या.
चिपळूणमधील पथकप्रमुख साहिल रानडे तसेच वेदांत विजय पवार, भावेश जयंत चिंगळे, धनश्री विवेक फिरमे, प्रणाली नारायण पंडव, प्रियांका पांडुरंग शिगवण, साक्षी दिनेश घाडगे, अंकिता संतोष डिंगणकर, ज्ञानेश्वरी जनार्दन हुमणे, सिद्धी सदानंद बोलाडे, साक्षी सूर्यकांत पवार, दीक्षा संदीप सुतार, पूनम संतोष घोरपडे, रोशनी सुनील घोरपडे, मृण्मयी मंदार ओक, सानिका मनोज लोटेकर यांचा समावेश होता. विघ्नहर्ता पथकातील धनश्री फिरमे ही आपदा सखी आहे. तसेच लांजातील आदित्य दिलीप कांबळे, अंकिता अविनाश जाधव, अनुष्का अविनाश जाधव, राजापुरातील आदिती सुनील कुर्ले, पूजा सुनील कुर्ले, रत्नागिरीतील नुपूर दत्ताराम कीर, खेडची प्रणोती बृहस्पती महाकाळ आणि पुण्याची गौरी नितीन जोशी यांचाही या पथकात समावेश होता.
संचलनाची सुरुवात महाराष्ट्राच्या पथकातील महिलांच्या शंखनाद आणि तुतारीसोबतच ढोल आणि ताशावादनाने झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी असलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ हे कर्तव्यपथावर उपस्थित होते. यानंतर तेलंगणा, कर्नाटक, आदी राज्यांतील महिला वादकांनी संचलन केले. हा प्रसंग डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.
यानंतर देशभरातील सुमारे १५०० नामांकित महिला नर्तकींच्या नृत्याचा आविष्कार पाहायला मिळाला. एसएनएच्या अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबईचे देवेंद्र शेलार आणि टीमच्या नृत्यदिग्दर्शनातून महाराष्ट्रातील महिलांचेही सांस्कृतिक कार्यक्रम लक्षवेधी होते.
कर्तव्यपथावर राष्ट्रगीत सुरू झाले. त्यानंतर संचलनाला सुरुवात झाली. लगेचच महाराष्ट्राच्या पथकाचे संचलन होते. हे संचलन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांच्यासमोर झाले. आमच्याकरिता हा क्षण रोमांचक असा होता. - धनश्री फिरमे, आपदा सखी, चिपळूण