उत्खननात ५0 टक्के द्या
By Admin | Published: February 27, 2015 10:53 PM2015-02-27T22:53:59+5:302015-02-27T23:18:23+5:30
चिपळूण पालिका : गौण खनिज वाहतुकीसाठी शहराचा वापर
चिपळूण : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असते. वाळू उपसाही होत असतो. मात्र, त्याची वाहतूक ही नगर परिषदेच्या रस्त्यावरुन होत असते. त्यामुळे रस्त्यांना खड्डे पडत आहेत. या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी नगर प्रशासनाला खर्च करावा लागतो. त्यामुळे गौण खनिजापासून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ५० टक्के उत्पन्न हे नगर परिषदेस मिळावे, असा ठराव शासन स्तरावर पाठवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर परिषदेच्या उत्पन्नात कोणकोणत्या उपाययोजनेनुसार भर पडेल या अनुषंगाने २०१५-१६ चे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकात गौण खनिज उत्खननाबाबत चर्चा झाली. शहरातील शॉपिंग सेंटरमधील गाळ्यांच्या भाड्यांची वसुली दर महिना होणे आवश्यक आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या भाजी मंडई, मटण मच्छीमार्केटबाबतचे काम पूर्ण करुन त्याचे मूल्यांकन करण्याची कार्यवाही तातडीने करुन नगर परिषदेचे उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने गाळे वितरित करण्याची कार्यवाही करावी, असेही सुचित करण्यात आले आहे.
शहरातील मोबाईल टॉवरचे सर्वेक्षण करून त्यावर कर आकारणी करण्यात यावी. व्यायाम शाळा चालवण्याकरिता अंदाजे वार्षिक खर्च २ लाख ५० हजार इतका आहे. व्यायाम शाळेपासून वार्षिक जमा अंदाजे ३० ते ३५ हजार आहे. त्यामुळे व्यायामशाळा फीमध्ये ३०० रुपये वाढ करण्यात यावी. जीमबाबत धोरणात्मक निर्णय कौन्सिलसमोर ठेवण्यात यावा अशी चर्चा झाली. अण्णासाहेब क्रीडा संकूल लवकरात लवकर चालू करुन ते सुरु करण्यात यावे. या ठिकाणी व्यावसायिक क्रीडा स्पर्धा प्रतिदिन २ हजार रुपये, विवाह समारंभ १० हजार रूपये, राजकीय कार्यक्रम ५ हजार रूपये व अन्य कार्यक्रमांसाठी ४ हजार रूपये घेण्यात यावे जेणेकरून यामधून ५ लाखांचे उत्पन्न वाढू शकेल. इमारतींना परवानगी देताना विकास करामध्ये या अंदाजपत्रकात वाढ करण्यात आली आहे. वाहतुकीची कोंडी दूर होण्याच्यादृष्टीने पालिकेच्या आरक्षण ठिकाणी जागेमध्ये पे अॅण्ड पार्क सुविधा करण्याबाबतही चर्चा झाली. पूर्वीच्या जाहिरात करातही वाढ करण्यात आली आहे. इमारत परवानगी, व्यवसाय ना हरकत दाखला यांच्या फीमध्ये वाढ केल्यास नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. चालू वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. (वार्ताहर)