वाढदिवसाला संस्कार करणारी पुस्तके मुलांना द्या
By admin | Published: December 12, 2014 09:51 PM2014-12-12T21:51:36+5:302014-12-12T23:52:08+5:30
गोविंद गोडबोले : मुलांच्या भेटीतून सातत्याने मिळत गेली लिखाणाची उर्मी
रत्नागिरी : नाट्यछटांच्या स्पर्धा आयोजित करुन मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. वाढदिवसाला हजारो रुपयांची भेट देताना त्यात लहान मुलांवर संस्कार करणारी पुस्तकेही भेट द्यावीत. मुलांना विचार करायला लावणाऱ्या व प्रबोधन करणाऱ्या बोली भाषेतील नाट्यछटांतून लेखिका अश्विनी आनंद पटवर्धन यांनी मुलात मूल होऊन लेखन केले आहे. त्यांनी हे व्रत असेच कायम जपावे, असे आवाहन बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक गोविंद गोडबोले यांनी व्यक्त केले.
ल. वि. केळकर सभागृहात लेखिका पटवर्धन यांच्या ‘पटवर्धनांच्या नाट्यछटा’ या पुस्तकाचे प्रकाशन गोडबोले तथा गोगो काकांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अॅड. राजेशखर मलुष्टे, माजी मुख्याध्यापक एच. डी. तथा बापूसाहेब जोशी, ग्रंथस्नेह प्रकाशनचे श्रीकृष्ण साबणे आणि अश्विनी पटवर्धन उपस्थित होत्या. अनुराधा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
गोगोकाकांनी रत्नागिरीविषयी विशेष ऋण व्यक्त केले. रत्नागिरी आकाशवाणीवर काम करताना ‘अंगतपंगत’च्या माध्यमातून केलेल्या लेखनाला राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. आज चांगले व सुसंस्कारित श्रोते आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रास्ताविकामध्ये साबणे यांनी सांगितले, ‘दत्त जयंतीला दीड तपापूर्वी ग्रंथस्नेहची स्थापना केली. त्यानंतर पुस्तक विक्रीपासून लेखक, कलाकार संवाद कार्यक्रम आयोजित केले. मुलांसाठी कथा, कविता, भाषणे, भारतरत्नांची माहिती आदी साहित्य प्रकाशित करण्यासाठी प्रकाशन व्यवसाय सुरु केला आहे. रत्नागिरीतील अनेक लेखकांना लिहिते करुन पुस्तके प्रकाशित करणार आहे.’
पटवर्धन यांनी सांगितले, ‘नाट्यछटांचे हे दुसरे पुस्तक आहे. माझ्या मुलींसाठी आणि मैत्रिणींच्या मुलांना स्पर्धा किंवा स्नेहसंमेलनासाठी नव्या नाट्यछटा लिहून दिल्या. मुलांकडून अनेक विषय मिळाले. त्यांच्या निर्व्याज, निरागस आणि निखळ वागण्यातून विषय सुचले आणि लेखन केले.’ अॅड. मलुष्टे म्हणाले, ‘मुलांवर संस्कार करणारे लेखन हवे आहे.’ आजकाल ‘माणसे ही पैसा निर्माण करणारी यंत्रे’ झाली आहेत. मुलांवर संस्कार करण्यासाठी महिला मंडळाने कार्यरत व्हावे, असे आवाहन बापू जोशी यांनी केले. यावेळी कवयित्री सुनेत्रा जोशी, प्रणव दामले, दिनकर गोडबोले, रोहिणी म्हसकर, दया भिडे, वसुधा भिडे यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)