टेस्ट करून बघा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:29 AM2021-05-15T04:29:48+5:302021-05-15T04:29:48+5:30
मधेच गाडी थांबून पोलिसांनी आम्हाला विचारलं, तसं बंडोपंतानी त्यांना काहीतरी सांगितल्यामुळे दंडुक्याचा प्रसाद मिळाला नाही. सकाळचे दहा वाजले असल्याने, ...
मधेच गाडी थांबून पोलिसांनी आम्हाला विचारलं, तसं बंडोपंतानी त्यांना काहीतरी सांगितल्यामुळे दंडुक्याचा प्रसाद मिळाला नाही. सकाळचे दहा वाजले असल्याने, बाजार बंद व्हायला एक तासाचा अवधी होता. पळत पळत आम्ही नेहमीच्या फळवाल्याकडे गेलो, तर तिथे पाटी लावली होती. देवगडी हापूस आंबा मिळेल. फक्त पाचशे रुपये डझन आम्ही आश्चर्यचकित झालो. आंबा घ्यावा की न घ्यावा, या विचारात असतानाच बंडोपंत म्हणाले, पाटीकडं कशाला बघता, घेऊ या ना आंबे ? तोवर फळवाला म्हणाला, काय साहेब, हापूस नाही घेतला अजून? अस्सल देवगडी आहे बघा! आम्ही आंबा घेण्याच्या विचारातच नसल्याने त्याच्या समाधानासाठी आंबा हातात घेऊन वास घेतला आणि म्हणालो, नेहमीच्या गिऱ्हाईकाला गंडवतोस होय? नाकाच्या इतक्या जवळ घेतला, तरी वास नाही आला. हापूस म्हणजे कसा घमघमाट हवाय. शांतपणे माझ्या हातातला आंबा घेत तो म्हणाला, तुम्ही टेस्ट करून बघा. मग आम्ही तो आंबा कापून फोड टेस्ट करायला? देईल म्हणून वाट बघता? थांबलोय फोड द्यायची त्याची काही हालचाल दिसेना, म्हणून दोन मिनिटांनी त्याला विचारलं, अरे देतोस ना टेस्ट करायला? तसा तो म्हणाला, आंब्याची टेस्ट नाही ओ साहेब, तिकडं सरकारी दवाखान्यात जाऊन कोरोनाची टेस्ट करून बघा. असं सांगतोय तुम्हाला, आंब्याचा वास येईना झालाय ना तुम्हाला! म्हणून म्हटलं. बंडोपंत आणि आम्ही उडालोच राव! आम्ही हापूस आंबे न घेताच घरचा रस्ता पकडला. पुढे घरी काय झालं असेल, ते तुम्हीच ओळखा. जय कोरोना!
डॉ.गजानन पाटील, रत्नागिरी