जमिनींचा मोबदला जास्त द्या : भरत लब्धे
By admin | Published: April 19, 2017 12:52 PM2017-04-19T12:52:38+5:302017-04-19T12:52:38+5:30
गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्गासंदर्भात संघर्ष समितीची मागणी
आॅनलाईन लोकमत
शिरगाव (जि. रत्नागिरी),दि. १९ : गुहागर - विजापूर राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गामध्ये रुपांतर करण्याच्या शासन निर्णयानंतर वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती घेण्याच्या उद्देशाने संघर्ष समितीचे अध्यक्ष भरत लब्धे यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता बामणे यांची भेट घेऊन चर्चा केली. या मार्गाचे काम दर्जेदार व्हावे, पर्यटनदृष्ट्या काही ठिकाणे विकसित करावीत, या महामार्गासाठी ज्यांच्या जमिनी संपादित केल्या जातील, त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा, अशी मागणी लब्धे यांनी केली.
यावेळी पाटण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती नाना गुरव, राजन कुलकर्णी, लियाकत कुठरेकर, प्रकाश लब्धे आदी उपस्थित होते. शासनाकडून राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाल्यानंतर मार्गालगतच्या रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली होती. आपली रोजी-रोटी, आपले सर्वस्व आपण गमावून बसणार, आपणावर विस्थापित होण्याची वेळ येणार, अशी भीती सर्वांना वाटत होती.
ध्रुव एजन्सी, पुणे यांच्याकडे या महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम आहे. चर्चेवेळी एजन्सी प्रमुख मळेकर सहकाऱ्यांसमवेत उपस्थित होते. मळेकर यांनी संपूर्ण नकाशासह शिष्टमंडळाला माहिती दिली.
महामार्गासाठी रस्त्याचा पृष्ठभाग एकूण १० मीटर इतका असून, दोन्ही बाजूला २ मीटर साईडपट्टी व गटार अशी रचना आहे. या चर्चेदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या.
धोकादायक वळणे काढावीत, जेणेकरून अपघात होणार नाहीत. कुंभार्ली घाटामध्ये काही ठिकाणी तीव्र चढ व वळणे असल्यामुळे अवजड वाहने चढत नाहीत. परिणामी मध्येच रस्त्यात बंद पडतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक ठप्प होते, असे तीव्र चढ कमी करावेत, संपूर्ण घाट ते पोफळी, शिरगाव, सतीपर्यंत धोकादायक ठिकाणी मजबूत संरक्षक भिंती उभारण्यात याव्यात. ढाणकलजवळील धबधबा व काही ठिकाणे पर्यटनदृष्ट्या विकसित करावीत, अशी मागणी करण्यात आली. (वार्ताहर)