लसीकरण करताना स्थानिकांना प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:28 AM2021-04-26T04:28:26+5:302021-04-26T04:28:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील निवे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करताना स्थानिक सोडून बाहेरच्या लोकांनाच प्राधान्य देण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील निवे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करताना स्थानिक सोडून बाहेरच्या लोकांनाच प्राधान्य देण्यात येत असल्याने भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रूपेश कदम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिकांना आधी प्राधान्य द्या नंतर बाहेरच्यांना लस द्या, असे सांगत कारभार सुधारला नाही तर याविरोधात वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सचिन मांगले यांनीही आज याच कारणावरून संबंधित आरोग्य केंद्राच्या अधिकारी आणि कर्मचारी यांची झाडाझडती घेतली.
देवरूख - मार्लेश्वर मार्गावर असलेल्या निवे प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले काही दिवस या केंद्रांतर्गत येणारी १६ गावे वगळता बाहेरून येणारी माणसे अधिक लस घेत असल्याची तक्रार होती. स्थानिक लोकप्रतिनिधींचा एक नातेवाईक तालुकास्तरावरून वैद्यकीय अधिकारी यांच्यावर दबाव आणत हे काम करीत असल्याच्या तक्रारी होत्या. शुक्रवारीही तसाच प्रकार घडल्यावर भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रूपेश कदम यांनी या केंद्राला भेट दिली. त्यावेळी स्थानिक वगळता केंद्राशी संबंध नसलेल्या भलत्याच गावातील नागरिक लसीकरणात आघाडीवर होते. याबाबत त्यांनी केंद्रात जाब विचारला असता त्यांना योग्य उत्तरे देण्यात आली नाहीत. शेवटी त्यांनी या केंद्रात जी गावे येतात तिथले नागरिक लसीकरणासाठी माेठ्या आशेने इथे येतात त्यांना प्राधान्य द्या आणि उरलेले डोस इतरांना द्या, अशी मागणी केली.
यानंतर त्यांनी देवरूख गटविकास अधिकारी यांच्याशीही दूरध्वनीवरून संपर्क साधून ही गोष्ट कानावर घातली. यात सोमवारपासून सुधारणा न झाल्यास याविरोधात वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हा परिषद गटातील स्थानिक लोकप्रतिनिधीचा एक नातेवाईक जर असे प्रकार करणार असेल तर स्थानिक जनता ते खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. संगमेश्वर तालुक्यातील बहुतांशी आरोग्य केंद्रात सध्या हीच स्थिती असून, स्थानिक वगळून अन्य भागातील प्रतिष्ठितांना लस देण्याचे प्रमाण वाढले आहे. संगमेश्वरचे सभापती जयसिंग माने यांनी या गोष्टीत लक्ष घालून यामध्ये सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.