कोरोनाचे काम केलेल्या परिचारिकांनाच भरतीत प्राधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:32+5:302021-07-16T04:22:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : कोरोना साथीत काम केलेल्या परिचारिकांनाच शासकीय भरतीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी काँग्रेसतर्फे आराेग्य ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : कोरोना साथीत काम केलेल्या परिचारिकांनाच शासकीय भरतीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी काँग्रेसतर्फे आराेग्य विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गौस खतीब यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. यावेळी डॉ. विलास शेळके, बशीर मुजावर आणि अनिल सदरे उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात पहिल्या लाटेपासून तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात तसेच जिल्ह्यात अन्य शासकीय रुग्णालयात आपल्या जीवाची पर्वा न करता, परिचारिका, अधिपरिचारिका म्हणून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्यांना प्रसिद्ध झालेल्या भरती जाहिरातीत प्राधान्य देण्यात यावे, नंतर गुणांनुसार भरती करावी. संकटाच्या वेळी कोविड योद्धा म्हणून धावून आलेल्या या परिचारिकांना वाऱ्यावर सोडू नये, त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, तसेच शासनाच्या सेवेत रिक्त पदांवर त्यांना भरती करून घ्यावे. याबाबत अनेक मंत्री, आरोग्य मंत्री यांनीही आश्वासन दिले आहे. मात्र, अजूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. रत्नागिरी जिल्ह्यात एनएचएमअंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. किमान त्या ठिकाणी कोरोना काळात शासकीय रुग्णालयात गेल्या वर्षी आणि आताही सेवा बजावणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. नंतर मेरिटवाल्यांचा विचार करावा, असे न झाल्यास लोकशाही पद्धतीने उपजिल्हा रुग्णालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.