आंबा, काजू बागायतदारांना सरकसकट कर्जमाफी द्या; रत्नागिरीत भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By मेहरून नाकाडे | Published: July 25, 2023 06:45 PM2023-07-25T18:45:38+5:302023-07-25T18:46:06+5:30
शासनाच्या उदासीनतेबद्दल संताप
रत्नागिरी : आंबा, काजू बागायतदारांना सरसकट कर्जमाफी देत सातबारा कोरा करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.२५) बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. भर पावसात आंबा-काजू बागायतदारांनी मोर्चा काढला तसेच दिवसभर धरणे आंदोलनही केले. आंदोलनात सहभागी संख्येवरून बागायतदारांची एकजूट निदर्शनास आली.
‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, ‘आवाज कुणाचा शेतकऱ्यांचा’, अशा विविध घोषणा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेवर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बागायतदारांच्या प्रश्नाबाबत शासन, प्रशासनाच्या उदासीनतेचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
जिल्ह्यातील बागायतदारांना संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरे करा, कोकणतील प्रदूषण कारखाने बंद झाले पाहिजे, फळपिक विम्याचे निकष बदलावे यांसह अनेक मागण्यांसाठी आंबा, काजू बागायतदारांनी मोर्चा काढला होता. बागायतदारांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष दिवसभर धरणे आंदोलनही केले. २०१४-१५ या वर्षांपासून २०२३-२४ पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे व्याज व पुढील वर्षांसाठी ४ टक्के व्याजाने शासनाने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, शेतकऱ्यांचा कृषिपंप व घरगुती मीटरचे दर कमी करण्यात यावेत, शेतकऱ्यांना खते व औषधे खरेदी केलेल्या बिलावर शासनाने अनुदान देण्यात यावे, आंब्याच्या तसेच कोकणातील विविध पिकांच्या संशोधनासाठी रत्नागिरी येथे सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यात यावी यांसह अन्य मागण्या बागायतदारांनी केल्या आहेत.
यावेळी प्रकाश साळवी, कुमार शेट्ये, नंदकुमार मोहिते, मंगेश साळवी, मन्सूर काझी, सचीन आचरेकर, किरण तोडणकर, अशोक भाटकर मोर्चात सहभागी झाले होते.