केशरी रेशनकार्डधारकांना विनाअट धान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:21 AM2021-06-23T04:21:08+5:302021-06-23T04:21:08+5:30
पाचल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व केशरी रेशनकार्डधारकांना विनाअट धान्य पुरवठा करण्याची मागणी कोकण विकास आघाडीचे तालुका संघटक सुरेश गुडेकर ...
पाचल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व केशरी रेशनकार्डधारकांना विनाअट धान्य पुरवठा करण्याची मागणी कोकण विकास आघाडीचे तालुका संघटक सुरेश गुडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केशरी रेशनकार्डधारकांना प्रतिव्यक्ती ठरावीक धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार त्यांना काही ठरावीक दराने फक्त दोन महिने धान्य पुरवठा करण्यात आला. त्यानंतर केशरी रेशनकार्डधारकांचा धान्यपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे केशरी रेशनकार्डधारकांमधून कमालीचा संताप तथा नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ज्या केशरी रेशनकार्डधारकांचे उत्पन्न ४९ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा रेशनकार्डधारकांना धान्य दिले जात नाही. त्यामुळे केशरी रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित आहेत. केशरीकार्डधारकांसाठी असलेली उत्पन्नाची अट त्वरित रद्द करून सर्व केशरी रेशनकार्डधारकांना विनाअट धान्य पुरवठा करण्याची मागणी सुरेश गुडेकर यांनी केली आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी दारिद्र्यरेषेखालील लोकांना पिवळी रेशनकार्ड देण्यात आली होती. या कालावधीत लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यासाठी शासन स्तरावर किती प्रयत्न झाले हा वादातीत मुद्दा आहे. पूर्वी ज्याच्याकडे रेशनकार्ड होती, त्यापैकी सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे आदींना वगळून उर्वरितांची कार्ड केशरी म्हणून ठेवण्यात आली. मात्र, त्यावेळी विशिष्ट अशा उत्पन्नाची अट ठेवण्यात आली नव्हती. त्यावेळी हे सर्व केशरी रेशनकार्डधारक किरकोळ व्यवसायधारक व मोठी शेतीधारक होते. मात्र, त्यानंतरच्या एका शासन निर्णयानुसार या उत्पन्नधारकांना रुपये ४९ हजार रुपयांची मर्यादा घालण्यात आली होती. त्यामुळे दहा वर्षे या केशरी कार्डधारकांचे धान्य बंद झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे बहुसंख्य केशरी रेशनकार्डधारक त्यांचे छोटे व्यवसाय बंद करून घरी बसले आहेत. त्यांच्या उत्पन्नाचे साधन बंद झाल्याने खुल्या बाजारातील महागडे अन्न-धान्य घेणे त्यांना परवडत नाही. अशा परिस्थितीत त्यांच्याजवळ असणाऱ्या केशरीकार्डचा आधार वाटत होता; परंतु उत्पन्नाची अट घातल्याने त्यांना धान्य नाकारले जात आहे. अशा परिस्थितीत घरी राहून कसे जगावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी केशरी रेशनकार्डधारकांना लावलेली उत्पन्नाची अट त्वरित काढून शासनाने सर्व केशरी कार्डधारकांना धान्य पुरवठा करण्याची मागणी सुरेश गुडेकर यांनी केली आहे.