प्रशासन आमच्याकडे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 11:55 PM2016-05-13T23:55:51+5:302016-05-13T23:55:51+5:30
गुहागर पंचायत समिती सभा : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या हतबलतेमुळे सदस्य आक्रमक
गुहागर : तालुक्यातील शिक्षकांचे समायोजन व बदली विषय याबाबत गटशिक्षणाधिकारी यांनी मासिक सभेत हतबलता दर्शवली. यावरुन शिक्षक संघटना शिक्षण विभाग चालवतात का? असा सवाल करत शिक्षक विभागाचे प्रमुख म्हणून तुमचे अधिकार वापरा, नाहीतर शिक्षण संघटनेच्या ताब्यात प्रशासन द्या, अशा शब्दात सदस्य सुरेश सावंत यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले.
गुहागर पंचायत समितीने तत्कालीन उपसभापती राजेश बेंडल यांच्या कारकिर्दीत तालुक्यात सेमी इंग्लिश शाळा सुरु केल्या. यानंतर जिल्हास्तरावरुन शाळांची ही संख्या सर्वच ठिकाणी वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुरुवातीच्या काळात चार सेमी इंग्लिश शाळा होत्या. आता त्यांची संख्या आता २१ वर पोहोचली आहे. पाचवीपर्यंत वर्ग आल्याने या शाळांवर इंग्रजी माध्यमाचे शिक्षक असणे आवश्यक आहे. अन्यत्र शाळेत असे शिक्षक उपलब्ध आहेत. तालुका प्रशासनाला समायोजनाचा अधिकार मिळाल्यास हा प्रश्न सुटेल यासाठी वरिष्ठ पातळीवर मंजुरी मिळावी असा ठराव यावेळी करण्यात आला. तसेच नव्याने येणाऱ्या इंग्रजी माध्यम शिक्षकांना या शाळा द्याव्यात. अशावेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपले अधिकार वापरावेत, असे सुरेश सावंत व राजेश बेंडल यांनी सांगितले. यावर मात्र गटशिक्षणाधिकारी यांनी हतबलता दर्शवत कोणी तक्रार केल्यास सर्व प्रक्रिया थांबवावी लागेल, असे सांगितले. शिक्षक बदलीवर शिक्षक संघटना वरचढ ठरतात का? असा सवाल केला.
ग्रामीण पाणी पुरवठ्यांतर्गत टँकरचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर यासाठीचा निधी असूनही उधारीवरती डिझेल व इतर खर्च का करावा लागतो? असे राजेश बेंंडल यांनी विचारले. आरे (ब्राह्मणवाडी) भागात बोअरवेलला मोठ्या प्रमाणात पाणी लागले ही बाब चांगली आहे. तरीही कुरतुडवाडी व इतर काही वाड्यांची मागणी असूनही ब्राह्मणवाडीतील अकरा घरांमध्येही विहिरी असूनही, येथे बोअरवेल का मारली गेली? असा सवाल सुरेश सावंत यांनी केला. एकात्मिक बालविकास अंतर्गत काही अंगणवाड्यांना गेली चार वर्षे रॉकेल, तांदूळ मिळालेला नाही. तो नियमीत मिळावा यासाठी ठरावाने पत्रव्यवहार करावा, असे सांगण्यात आले.
ब्राह्मणवाडी येथे बोअरवेलला पाणी लागल्यानंतर आरोग्य विभागाने हे पाणी पिण्यायोग्य आहे का? याची पाणी नमुना चाचणी का केली नाही, असेही विचारण्यात आले. यावेळी सभापती विलास वाघे, सुनील जाधव, संपदा गडदे, गायत्री जाधव, पूनम पाष्टे, सूचना बागकर, पांडुरंग कापले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कारवाई का नाही : कर्मचाऱ्याला मारहाण
आरोग्य विभागांतर्गत हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याला डॉक्टरकडून मारहाण झाल्याबाबत कर्मचारी संघटनेतर्फे काळ्या फिती लावून कर्मचारी ड्युटीवर असताना कामावर कसे बाहेर पडले, या कर्मचाऱ्यावर अद्याप का कारवाई झाली नाही, असा जाब या सभेत विचारण्यात आला.
अहवाल घ्यावा
ग्रामपंचायत विभागांतर्गत ‘ग्राम उदय ते भारत उदय’ अभियानादरम्यान सर्व ग्रामपंचायतींना निधी मिळाला आहे. सर्व दिवस हे अभियान राबविले का? याबाबत पाठपुरावा करुन अहवाल घ्यावा, असे यावेळी सदस्यांकडून सांगण्यात आले.
कारवाई करणार
आरोग्य विभागांतर्गत डॉक्टरकडून झालेल्या मारहाणीबाबत दोन दिवसात कारवाई करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी बी. ई. साठे यांनी सांगितले.