कृषी माध्यमातून जागतिकस्तरावर आयात-निर्यात : उपजिल्हाधिकारी कांबळे
By मेहरून नाकाडे | Published: August 11, 2023 03:46 PM2023-08-11T15:46:06+5:302023-08-11T15:46:37+5:30
रत्नागिरीत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन
रत्नागिरी : एकूण उत्पादनाच्या ६५ टक्के उत्पादन कृषीचे आहे. कृषीच्या माध्यमातून जागतिकस्तरावर निर्यात/आयात केली जाते. भारत हा कृषी प्रधान देश असून अनेक प्रयोगशील शेतकरी व्यावसायिक शेती करू लागले आहे. जिल्ह्यातील लाल मातीतही विविध पिके घेण्यात येत असून अनेक महिलाशेतकरी गटाच्या माध्यमातून शेतीकडे वळल्या आहेत. शेतीमाल उत्पादन व विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळवित सक्षम बनल्या आहेत. या महिलांची प्रगती अन्य महिला शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी, असल्याचे प्रतिपादन, भू संपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी निशाताई कांबळे यांनी केले.
रत्नागिरी कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मा, रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ, नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास कार्यक्रम, लोक संचलित साधन केंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपजिल्हाधिकारी निशाताई कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपिठावर जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे, शिरगांव भात संशोधन केंद्राचे अधिकारी डाॅ. विजय दळवी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्येचे कृषी विद्यावेत्ता डाॅ. किरण माळशे, नाबार्डचे मंगेश कुलकर्णी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी अमरीश मेस्त्री, जिल्हा संसाधन व्यक्ती अमाेल कांबळे, जलजिविका कार्यक्रम अधिकारी अंकिता पाटील उपस्थित होते.
मान्यवरांचे हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश विषद केला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांनी रानभाज्यांचे महत्व सांगून त्यातील पाैष्टीक गुणधर्मामुळे आहारात समावेश करावा. कमी खर्चात, नैसर्गिक उगवणाऱ्या, विषमुक्त भाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले.
रानभाज्या महोत्सवानिमित्त पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रज्ञा फडके (परांकी), संकीता बने (टाकळा भाजी), तृतीय क्रमांक सुलभा भणसळकर (फोडशीची वडी) यांनी मिळविला स्पर्धेचे परीक्षण मेघना शेलार यांनी केले. सूत्रसंचलन दीपक काळे यांनी केले. ग्रामीण भागातील महिलांनी विविध रानभाज्या स्पर्धेत मांडल्या होेत्या.