लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळी जाऊन जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन
By शोभना कांबळे | Published: August 1, 2023 04:27 PM2023-08-01T16:27:03+5:302023-08-01T16:29:48+5:30
लोकमान्यांच्या जीवन चरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तूंची पाहणी केली
रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी मंगळवारी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळी त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. याठिकाणी असणाऱ्या ध्वजस्तंभावर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहणही करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हेही होते.
स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे असे ब्रिटीशांना ठणकावून सांगताना लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य संग्रामाचे चैतन्य निर्माण केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळावर असणाऱ्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकारी सिंह आणि पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी अभिवादन केले. याठिकाणी झालेल्या ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत म्हटले. त्यांनतर लोकमान्यांच्या जीवन चरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तूंची पाहणी केली.
यावेळी प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, पुरातत्व विभागाचे कनिष्ठ अभियंता शांताराम केकडे, पुरातत्व विभागाचे सुरेश भडांगे, मंडळ अधिकारी विलास सरफरे, रुची शेट्ये यांनीही अभिवादन केले.