गोव्याचा मंदार लाड ठरला सप्रे स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता; १११ खेळाडूंचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 04:48 PM2024-02-10T16:48:02+5:302024-02-10T16:48:09+5:30
प्रथम विजेत्या मंदार लाड याला रोख रक्कम ११००० व चषक देऊन गौरविण्यात आले
मेहरून नाकाडे, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: येथील के.जी.एन सरस्वती फाऊंडेशनतर्फे आयोजित भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते (कै.) रामचंद्र सप्रे स्मृती सलग दहाव्या वर्षी खुल्या जलद बुध्दीबळ स्पर्धेत गोव्यातील मंदार लाड विजेता ठरला आहे. या स्पर्धेत एकूण १११ खेळाडू सहभागी झाले होते.
प्रथम विजेत्या मंदार लाड याला रोख रक्कम ११००० व चषक देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूरच्या सोहम खसबरदारने द्वितीय तर रवींद्र निकम याने तृतीय क्रमांक मिळविला. दोघांना अनुक्रमे ९००० रूपये व ७५०० रूपयांची बक्षिसे देवून गौरवण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी ज्येष्ठ क्रीडापटू, चेसमेनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर, ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे, केजीएन सरस्वती फाउंडेशन व कऱ्हाडे ब्राम्हण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी, ऋचा जोशी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत मुंबई, सांगली, सतारा, कोल्हापूर, पुणे, गोवा, कर्नाटक येथून स्पर्धकांनी सहभाग घेतला. यापैकी ४० हून अधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय फीडे गुणांकन प्राप्त खेळाडू होते. स्पर्धेत मुख्य पंच म्हणून विवेक सोहानी, चैतन्य भिडे यांच्यासोबत दीपक वायचळ, आरती मोदी आणि सूर्याजी भोसले यांनी काम पाहिले.