दक्षिण रत्नागिरी युवा महोत्सवात गोगटे महाविद्यालयाला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:31 PM2018-08-13T13:31:42+5:302018-08-13T13:35:15+5:30
मुंबई विद्यापीठाचा ५१वा आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव राजेंद्र माने इंजिनियरिंग महाविद्यालय, आंबव (देवरुख) येथे विविध कलाप्रकारांनी रंगला.
देवरूख : मुंबई विद्यापीठाचा ५१वा आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव राजेंद्र माने इंजिनियरिंग महाविद्यालय, आंबव (देवरुख) येथे विविध कलाप्रकारांनी रंगला. या महोत्सवात सादर झालेल्या ३२ कलाप्रकारांमध्ये रत्नागिरीतील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाने ५४ गुणांसह दक्षिण झोनचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. या महोत्सवात आठल्ये-सप्रे महाविद्यालय ३६ गुण, नवनिर्माण महाविद्यालय १७ गुण, फिनोलेक्स महाविद्यालय १६ गुण, राजेंद्र माने महाविद्यालय १४ गुण, भारत शिक्षण महाविद्यालय ९ गुण प्राप्त झाले आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष माजी राज्यमंत्री रवीद्र माने यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्षा नेहा माने, जान्हवी माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. नीलेश सावे, शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे माजी संचालक डॉ. प्रमोद पाबरेकर, समन्वयक प्रा. आनंद आंबेकर, सहसमन्वयक प्रा. राहुल कोतवडेकर उपस्थित होते.
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. सावे म्हणाले की, हा युवा महोत्सव एखाद्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथमच होत आहे. अशाप्रकारचे उपक्रम हे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी व जीवन जगण्याची कला शिकवणारे असतात. आंबव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी अशा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे सांगतानाच यातून मोठे कलाकार निर्माण होतात, असे सांगितले.
रवींद्र माने यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, अशा युवा महोत्सवातून नवा जोश मिळतो तसेच यशापयशाची चवही कळते आणि त्यातून सहभागी विद्यार्थ्यांना नवा धडा मिळतो. यावेळी त्यांनी सहभागी संघांना सुयश मिळावे, अशी सदिच्छा दिली. युवा महोत्सवाचे महाविद्यालय समन्वयक प्रा. गणेश जागुष्टे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
गोगटे महाविद्यालयाला १५ पारितोषिक
रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमाकांची दहा, द्वितीय क्रमांकाची तीन तसेच तृतीय व उत्तेजनार्थ प्रत्येकी एक अशा एकूण पंधरा पारितोषिकांसह या युथ फेस्टिवलमध्ये आपला ठसा उमटवला.
देवरूखच्या आठल्ये-सप्रे महाविद्यालयाने प्रथम क्रमाकांची सात, द्वितीय क्रमांकाची दोन तसेच तृतीय व उत्तेजनार्थ प्रत्येकी एक अशी एकूण बारा पारितोषिके मिळवली. भारत शिक्षण मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रत्नागिरी, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय, रत्नागिरी तसेच फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी यांनीही प्रत्येकी सहा पारितोषिके मिळवली.