गोवळकोट रस्ता दुरुस्तीचे काम पाडले बंद, डांबराचा वापर कमी, नागरिक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:26 PM2019-03-06T12:26:20+5:302019-03-06T12:28:09+5:30
अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर बांधकाम अभियंता नागरिकांच्या अंगावर गेल्याने काही काळ वातावरण तापले होते. यामध्ये मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.
चिपळूण : शहरातील गोवळकोट येथे सुरु असलेल्या रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी हे काम बंद पाडले. कारपेट करताना खडीवर अल्प प्रमाणात डांबर वापरले जात होते.
याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर बांधकाम अभियंता नागरिकांच्या अंगावर गेल्याने काही काळ वातावरण तापले होते. यामध्ये मुख्याधिकारी डॉ.वैभव विधाते यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.
गोवळकोट रोड ते गोवळकोट असे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु आहे. सुरुवातीपासूनच हे काम वादग्रस्त ठरले आहे. बीबीएम करताना ठेकेदाराने डांबराचा पुरेसा वापर केला नाही म्हणून येथील नागरिकांनी हे काम बंद पाडले होते.
मुख्याधिकारी डॉ.विधाते यांनी रस्त्याची पाहणी करुन ठेकेदाराला समज दिली. नगर परिषदेने चांगल्या कामाची हमी दिल्यानंतर रस्ते दुरुस्तीचे काम पुन्हा सुरु झाले. मात्र कारपेट करताना अनेक ठिकाणी डांबराचा वापर कमी प्रमाणात झाल्याने नागरिक आक्रमक झाले.
एका दिवसात अनेक ठिकाणची खडी वर आल्यामुळे नागरिक संतप्त झाले. मंगळवारी सकाळी गोवळकोट रोड येथील कमानीच्या परिसरात काम सुरु होते. आक्रमक नागरिकांनी ते बंद पाडून अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलविले.
मुख्याधिकारी डॉ.विधाते, स्थानिक नगरसेवक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी कारपेट केलेला रस्ता हाताने उखडून दाखविला. डांबरीकरण केल्याने खडी सहज वर येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदाराला ताकीद देण्याची हमी दिली.