सोन्याचा भाव घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:32 AM2021-04-02T04:32:43+5:302021-04-02T04:32:43+5:30
रत्नागिरी : सध्या लग्नसराई हंगाम सुरू झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट होऊ लागली आहे. सध्या ...
रत्नागिरी : सध्या लग्नसराई हंगाम सुरू झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट होऊ लागली आहे. सध्या ४४,३०० रुपयांवर सोन्याचा दर आला असून ०.३ टक्क्यांची घट झाली आहे. चांदीच्या दरातही ०.८ टक्क्यांची घट झाली असून प्रतिकिलोसाठी ६२,६१७ रुपये इतका दर खाली आला आहे.
संचारबंदी वाढविली
रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यात १४४ कलम लागू केले असून रात्रीच्या संचारबंदीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविली आहे. त्यानुसार दुकानांमध्ये किंवा परिसरात ५ पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास कारवाई होणार आहे. तसेच ६ फुटापर्यंत अंतर राखणे बंधनकारक आहे.
शिमगोत्सव साधेपणाने
पावस : कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने शिमगोत्सवावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पावस परिसरातील शिमगोत्सव साधेपणाने साजरे होत आहेत. यावर्षी नवलादेवी, रवळनाथ भेटीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
रस्त्याचे काम मार्गी
दापोली : दाभोळ गावातील खड्डेमय झालेला रस्ता कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता पूर्णत्वास गेला आहे. दाभोळ - उजगाव रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामासाठी निधी मंजूर झाल्याने रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक आणि ग्रामस्थ यांना दिलासा मिळाला आहे.
रस्त्यावर खड्डे
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी गावातील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करतच ये-जा करावी लागत आहे. माळवाशी फाटा ते हायस्कूलपर्यंतचा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे प्रवासी आणि ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित करावे, अशी मागणी होत आहे.
वाटुळ येथे बीजउत्सव
वाटुळ : राजापूर तालुक्यातील वाटुळ येथील तांबळवाडी वारकरी सांप्रदायिक मंडळ यांच्या वतीने संत तुकाराम महाराज बीजउत्सव नुकताच साजरा करण्यात आला. बाळकृष्ण मुरारी चव्हाण बुवा यांचे तुकाराम महाराजांवर कीर्तन सादर झाले. तसेच महाप्रसाद, हरीपाठ, कीर्तन आदी कार्यक्रमही आयोजित केले होते.
प्रीत बोरकरला सुवर्णपदक
आवाशी : राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनच्या वतीने ऑनलाईन राज्यस्तरीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात महाराष्ट्र संघाने २४ कांस्य, तीन सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली. लहान मुलांच्या गटात प्रीत बोरकरने सुवर्णपदक पटकावले. ही स्पर्धा सहा गटांत घेण्यात आली.
तापमानात बदल
दापोली : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा कहर झाला आहे. तापमानात सतत चढ-उतार सुरू आहे. दापोलीतील कमाल तापमान दोन दिवस स्थिर असून किमान तापमानात आता घसरण होत आहे. सध्या तापमान वाढू लागल्याने दापोलीकरांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.
जेल रोडवर खड्डे
रत्नागिरी : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जेल रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयही याच मार्गावर आहे. त्यामुळे सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र, सध्या हा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालकांच्या नाकीनऊ येत आहेत.
उकाड्याने हैराण
रत्नागिरी : एप्रिल महिन्याला सुरुवात होताच रत्नागिरीकरांना उकाड्याने अधिकच हैराण केले आहे. १५ मार्चनंतर उकाड्याला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. उष्मा वाढू लागल्याने त्यापासून सुटका मिळण्यासाठी नागरिक सध्या शीतपेयांकडे वळत आहेत.