दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णकन्या चमकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 10:54 AM2019-12-05T10:54:15+5:302019-12-05T10:56:49+5:30
नेपाळ - काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील (सॅप गेम) अंतिम सामन्यात भारताने यजमान नेपाळवर १७-०५ असा एक डाव बारा गुणांनी विजय संपादन करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील भारतीय संघात सहभागी रत्नकन्या ऐश्वर्या सावंत व अपेक्षा सुतार दोघींनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताला विजय मिळवून देण्यात दोघींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
रत्नागिरी : नेपाळ - काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील (सॅप गेम) अंतिम सामन्यात भारताने यजमान नेपाळवर १७-०५ असा एक डाव बारा गुणांनी विजय संपादन करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील भारतीय संघात सहभागी रत्नकन्या ऐश्वर्या सावंत व अपेक्षा सुतार दोघींनी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारताला विजय मिळवून देण्यात दोघींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऐश्वर्याची दुसरी, तर अपेक्षाची पहिलीच स्पर्धा होती. आठपेक्षा अधिक देश सहभागी झाले होते. अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात ऐश्वर्या सावंत हिने तीन मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण केले, तर प्रियंका भोपीने दोन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण केले. कृष्णा यादवने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले. आक्रमणात कर्णधार नसरीन व काजल भोरने प्रत्येकी पाच खेळाडूंना बाद करून विजय सोपा केला. दुसऱ्या डावात सस्मिता शर्माने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले. मुकेशने तीन मिनिटे, तर कलाईवीनने दोन मिनिटे संरक्षण केले व विजय साजरा केला.
नेपाळच्या पुनम थारूने एक मिनिट दहा सेकंद संरक्षण केले व अंजली थाने एक मिनिट संरक्षण करून जोरदार लढा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत अपेक्षा सुतार व ऐश्वर्या सावंत यांनी उत्कृष्ट खेळ करून भारताला विजय संपादन करून दिला. शिवाय दोघींनी सुवर्णपदकांची कमाई केली आहे. ऐश्वर्या, अपेक्षा यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर यश संपादन करून रत्नागिरीचा झेंडा उंचावला असून, दोघींचे कौतुक होत आहे.