कोकण बोर्ड एक नंबरलाच राहण्यासाठी सांघिकपणाने काम करु : उदय सामंत

By मनोज मुळ्ये | Published: October 14, 2024 01:24 PM2024-10-14T13:24:18+5:302024-10-14T13:27:19+5:30

रत्नागिरी : रत्नागिरीत सर्वात चांगले ज्ञानदान होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. कोकण बोर्ड सतत राज्यात पहिले राहिले ...

Good knowledge in Ratnagiri; Konkan will work as a team to top the board says Guardian Minister Uday Samant | कोकण बोर्ड एक नंबरलाच राहण्यासाठी सांघिकपणाने काम करु : उदय सामंत

कोकण बोर्ड एक नंबरलाच राहण्यासाठी सांघिकपणाने काम करु : उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरीत सर्वात चांगले ज्ञानदान होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. कोकण बोर्ड सतत राज्यात पहिले राहिले आहे. ते एक नंबरलाच राहिले पाहिजे, यासाठी सांघिकपणाने काम करु, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोकण विभागीय मंडळाच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मंत्री सामंत यांनी कुदळ मारुन आणि दीपप्रज्वलन करुन आज केले. यावेळी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार तथा राज्य मंडळाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विक्रम काळे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, विभागीय सचिव सुभाष चौगुले, कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एम. कासार उपस्थित होते.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, २०१२ मधील कोकण बोर्डाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. तेव्हापासून मेहनतीने आणि ताकदीने राज्यात पहिल्या क्रमांकावर कोकण बोर्ड राहिले आहे. त्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो. २४ कोटी रुपयांमधून राज्यातील सर्वात देखणी इमारत वर्ष दीड वर्षात उभी राहील, असे ते म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देऊन मंत्री सामंत म्हणाले की, ज्यांनी ज्यांनी मराठी शिकविली, ज्यांनी ज्यांनी मराठी सुदृढ केली, त्या शिक्षकांना आणि साहित्यिकांना याचे श्रेय जाते. नव्या प्रशासकीय इमारतीमधून दरवर्षी ५० हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे ही इमारत नसून, मंदिर आहे, असे ही ते म्हणाले.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, कोकण बोर्डाची कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या कारकीर्दीत कोकण बोर्डाची स्थापना झाली आहे. आमदार विक्रम काळे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे या सर्वांचे कोकणावर विशेष लक्ष असते. त्यामुळे आमचे विद्यार्थी बोर्डाला नेहमीच राज्यात अव्वल ठेवतात. त्याबद्दल विद्यार्थी, पालकांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. यावेळी आमदार म्हात्रे आणि आमदार काळे यांनीही शुभेच्छा दिल्या. राज्य मंडळाचे अध्यक्ष गोसावी यांनी सर्वांचे आभार मानले.

Web Title: Good knowledge in Ratnagiri; Konkan will work as a team to top the board says Guardian Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.