जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान, पेरणीची कामे पूर्ण, लागवडीच्या कामांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:22 AM2021-06-24T04:22:17+5:302021-06-24T04:22:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे उरकल्याने लागवडीला प्रारंभ झाला आहे. पावसाने दमदार सलामी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे उरकल्याने लागवडीला प्रारंभ झाला आहे. पावसाने दमदार सलामी दिल्यामुळे यंदाचा शेतीचा सामना शेतकरीच जिंकतील, असे चित्र सध्या दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६७६९.९० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १२३५.४८ मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे.
‘ताैक्ते’ वादळापूर्वीच शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची बहुतांश कामे पूर्ण केली होती. वादळानंतर पाऊस सलग सुरू होता. पावसाची उघडीप झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्रातच पेरण्यांची कामे उरकली होती, त्यामुळे रोपे जोमदार वाढली आहेत. २० ते २१ दिवसानंतर रोपे काढून लागवड करण्यात येते. गेल्या दोन दिवसात पावसाने विश्रांती घेतली असली तरी भात खाचरातून पाणी बऱ्यापैकी साचले आहे. त्यामुळे पाणी असलेल्या क्षेत्रात प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी पावसावर डोंगराळ व पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रावरील लागवड उरकण्यात आली. जिल्ह्यात शेतीची कामे सलग सुरू असून, पावसाने उसंत घेतली असली तरी शेतकरी लागवडीच्या कामात व्यस्त आहेत.
मान्सूनपूर्व पावसावरच पेरण्यांची कामे उरकण्यात आल्याने लागवडीची कामे सुरू झाली आहेत. पावसाचा अंदाज घेत पाणी असलेल्या क्षेत्रावर भात लागवड करत आहोत.
- महेश रेवाळे, शेतकरी
कृषी विभागाने यावर्षी बांधावर खते उपलब्ध करून दिली असल्याने लाॅकडाऊन काळात खतासाठी प्रतीक्षा करावी लागली नाही. पेरण्या वेळेवर झाल्याने लागवडीची कामे सुरळीत सुरू आहेत.
- अमोल कुळ्ये, शेतकरी
यावर्षी पाऊस सुरुवातीपासून चांगला असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. खते, बियाणे बांधावरच उपलब्ध करून देण्यात आले. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागली नाही.
- मंदार गुरव, शेतकरी