सेतू अभ्यासक्रमासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:25+5:302021-07-08T04:21:25+5:30
रत्नागिरी : पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असले तरी कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. गतवर्षीही ऑनलाईन अध्यापन करण्यात ...
रत्नागिरी : पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असले तरी कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. गतवर्षीही ऑनलाईन अध्यापन करण्यात आले. कोरोनामुळे एप्रिलपासून वार्षिक परीक्षा न होता शाळा पुन्हा बंद झाल्या. गतवर्षातील अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी, यासाठी राज्य सरकारतर्फे सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सर्वच शाळांमध्ये शिक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू आहे. मागील सत्रात विद्यार्थी कोणत्या क्षमतेत मागे पडले, हे शोधून त्या क्षमतांची तयारी करून घेणे, हा या सेतू अभ्यासक्रम किंवा ब्रीज कोर्सचा उद्देश आहे. सेतू अभ्यासक्रम राबविण्याविषयी सविस्तर सर्व सूचना शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला देण्यात आल्या आहेत. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई-साहित्याच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. दि. १ जुलै ते १४ ऑगस्टअखेर सेतू अभ्यासक्रमाची अमलबजावणी ४५ दिवसांसाठी करण्यात येणार आहे.
सेतू अभ्यासक्रम इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून, मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर तो आधारित असून, हा अभ्यासक्रम सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पूर्ण करायचा आहे. सेतू अभ्यासक्रमामध्ये दिवसनिहाय कृतिपत्रिका देण्यात आल्या असून, कृतिपत्रिका या विद्यार्थी केंद्रीत, कृती केंद्रीत तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित असून, विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकणार आहेत.
सेतू अभ्यासक्रमामध्ये ठराविक कालावधीनंतर तीन चाचण्या देण्यात आलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांनी सोडविणे आवश्यक आहे. शिक्षकांनी या चाचण्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने सोडवून घेऊन त्या तपासाव्यात. या चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वत:कडे ठेवणे आवश्यक आहे. सेतू अभ्यासक्रम www.maa.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. याचा लाभ सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.