महामार्गावर ६८.४२ लाखांच्या विदेशी मद्यासह ९२.६२ लाखांचा माल जप्त
By शोभना कांबळे | Published: May 26, 2023 02:17 PM2023-05-26T14:17:59+5:302023-05-26T14:18:19+5:30
चिपळूण उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी.
रत्नागिरी : अवैद्य मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क् विभागाकडून गस्ती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत चिपळूण विभागाकडून राष्ट्रीय महामार्गावर अचानक वाहन तपासणी करताना चिपळूण रेल्वे स्टेशन फाटयाजवळ ६८.४२ लाखांचे विदेशी मद्य तसेच वाहन, कोळसा पावडर, मोबाईल आदींसह ९२,६२,५०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई २५ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभागाला मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार २५ रोजी वालोपे गावच्या हद्दीत चिपळूण रेल्वे स्टेशन फाटयाजवळ सापळा रचला. दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास चिपळूणकडून पनवेलच्या दिशेने येणा-या पांढ-या रंगाचा संशयित ट्रकाची (क्र. एमएच ०९-एफ एल ५७२४) झडती घेतली असता मागच्या बाजूला सुमारे २० किलो क्षमतेच्या कोळसा पावडरने भरलेल्या एकूण १२५ पोलीथीन गोणी तसेच त्यांच्या आड कागदी पुठ्याचे बॉक्स दिसले. त्या बॉक्समध्ये ऑरेंज फ्लेवर वोडका आणि ग्रीन अँपल वोडका या दोन ब्रॅंडच्या (७५० मिली क्षमतेच्या) एकूण ९५० बाॅक्समध्ये ९९,४०० सीलबंद बाटल्या आढळल्या.
या विदेशी मद्याची अंदाजे किंमत ६८, ४०,००० रूपये व ट्रकची अंदाजे किंमत २४ लाख, कोळसा पावडर (९९,५०० रूपये) व ९० हजार रूपये किंमतीचा मोबाईल असे एकूण ९२,६२,५०० रूपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. या मद्याच्या बाटल्यांवरील लेबलबरील तपशील तपासले असता बोगस कागदपत्रांच्या आधारे गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात विदेशी मद्याची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनात आले तसेच या मद्याचे उत्पादनही गोवा राज्यातच झालेले आहे. विदेशी मद्याचा साठा विना परवाना बेकायदेशीपणे महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून वाहतूक करीत असल्याचे दिसून आल्याने या ट्रकचालक सुरेश हरिबा पाटील (रा. शिवाजीनगर कडेगाव ता. कडेगाब जि.सांगली) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण यांच्या आदेशान्वये तसेच कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त श्रीविजय चिंचाळकर, रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभागाचे निरीक्षक व्ही.एस.मासमार दुय्यम निरीक्षक जयसिंग खुटावळे, गणेश नाईक, सहा.दुय्यम निरीक्षक राजेंद्र भालेकर, जवान सावळाराम वड यांनीही कामगिरी केली. यासाठी तुषार शिवलकर व सिद्धार्थ जाधव यांचे सहकार्य मिळाले. अधिक तपास निरीक्षक व्ही.एस.मासमार करीत आहेत.
अवैध विदेशी मद्याची वाहतूक करण्यामागे मुख्य सुत्रधार कोण आहे? याबाबत चालक सुरेश पाटील याची कसून चौकशी केली असता, त्याचा पुतण्या ओंकार हनमंत पाटील (रा. मलकापूर अहिल्यानगर ता. कराड जि.सातारा) हा सर्व व्यवहार करीत असल्याचे समजले.