गोवळकोट-पेठमापचा आजपासून साधेपणात शिमगोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:31 AM2021-03-26T04:31:53+5:302021-03-26T04:31:53+5:30
चिपळूण : कोकणात शेरणे कार्यक्रमामुळे प्रसिद्ध असणारा श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थान, गोवळकोट, पेठमाप व मजरेकाशी ...
चिपळूण : कोकणात शेरणे कार्यक्रमामुळे प्रसिद्ध असणारा श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थान, गोवळकोट, पेठमाप व मजरेकाशी देवस्थानचा शिमगोत्सव २६ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने निर्बंध घातल्याने यावर्षीचा शिमगोत्सव साधेपणात साजरा करण्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
या देवस्थानच्या पालखीदरम्यान भाविकांकडून आरत्या, नवस तसेच ओट्या स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच प्रसिद्ध असणारा शेरणे कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थानने दिली आहे.
२६ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरीची पालखी मंदिरातून बाहेर पडून मशिदीजवळ मानाची आरती घेऊन गोविंदगडावर श्री देवी रेडजाईची भेट घेण्यासाठी गडावरील सहाणेवर विराजमान होईल. येथे जगताप यांची मानाची आरती होईल. पालखी गडावरून खाली उतरून नित्य मार्गाने पुढे जाऊन चरावरील आरज घातला जाईल आणि गोवळकोट रोडमार्गे बाजारपुलाकडे प्रयाण करील. सायंकाळी ७.१५ वाजता बाजारपुलाजवळ आगमन होईल व तेथे आरज घातला जाईल. पुढे नित्य मार्गक्रमण करीत शिंगासन मंदिराजवळील होम लावून जाडेआळी मार्गे तांबट आळी होम, साळी समाजाचा होम, फरशीवरील आरज लावून परीटआळी मार्गे सीमेवर जाईल. सीमेवरील होम लावून मानकरी गोंधळी यांची आरती स्वीकारून सतीची विहीरमार्गे रात्री ९ .३० वाजता सहाणेवरील होम लावून विराजमान होईल.