सरकारची काटकसर, पाेषण आहारात तेलाएवजी साखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:22 AM2021-06-03T04:22:41+5:302021-06-03T04:22:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाकडून सहा महिने ते तीन वर्षे, गरोदर माता, स्तनदा माता यांना धान्य, डाळी, कडधान्य ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासनाकडून सहा महिने ते तीन वर्षे, गरोदर माता, स्तनदा माता यांना धान्य, डाळी, कडधान्य तेल, मीठ, तिखट स्वरूपात पोषण आहार दर दोन महिन्यांनी देण्यात येतो. कोरोनामुळे अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे या मुलांना ताजा पोषण आहार उपलब्ध होत नसल्याने धान्य स्वरूपात पोषण आहार वितरित केला जात आहे. जानेवारीमध्ये शासनाच्या अध्यादेशानुसार पाककृतीमध्ये बदल करण्यात आला असून, तेलाऐवजी साखर वितरित करण्यात येत आहे. शिवाय गहू व डाळींच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र कंझ्युमर फेडरेशन, मुंबईकडे धान्य वितरणाचा ठेका देण्यात आला आहे. त्यानुसार सुट्टीचे दिवस वगळून ५० दिवसांसाठी लाभार्थ्यांसाठी पोषण आहार अंगणवाडीकडे वितरित केला जातो. त्यानुसार अंगणवाडीच्या कर्मचारी यादीनुसार लाभार्थ्यांशी संपर्क साधून पोषण आहाराचे वाटप करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना तेलाऐवजी एक किलो साखर दिली जात असून गहू १६ ग्रॅम व मसूरडाळ आठ ग्रॅमने प्रमाण वाढविण्यात आले आहे. तेलाचे दर भडकलेले असतानाच तेलाऐवजी साखर दिली जात असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एप्रिल महिन्याच्या पोषण आहारापासून तेलाऐवजी साखर वितरित केली जात आहे.
अंगणवाडीतील बालकांना (तीन ते सहा वर्षे वयोगटातील) तसेच पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही शालेय पोषण आहार शिजवून दिला जात होता. मात्र कोरोनामुळे शाळा, अंगणवाड्या बंद असल्यामुळे पालकांना प्रत्येक लाभार्थ्यांना शासनाच्या निकषांनुसार डाळी, कडधान्ये, गहू, तांदूळ योग्य प्रमाणात वितरित केले जात आहेत.
काय - काय मिळते...
स्तनदा, गरोदर मातांना गहू, मसूरडाळ, हळद, तिखट, मीठ, साखर, चणे देण्यात येत आहेत. प्रत्येक लाभार्थ्यासाठी प्रमाण निश्चित केलेले आहे.
सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांसाठी गहू, चणे/चवळी/मटकी/मूग, मसूरडाळ, तिखट, मीठ, तेल दिले जात आहे.
तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना गरम ताज्या पोषण आहारात वरण-भात, खिचडी शिजवून देण्यात येत होती. त्यामुळे तांदूळ, चणे/मूग/मटकी/चवळी, गहू, मसूरडाळ, तिखट, मीठ, तेल देण्यात येते.
शासन अध्यादेशानुसार बदल
दि. २२ जानेवारी रोजी आयुक्तांच्या आदेशानुसार पोषण आहारात बदल करण्यात आला आहे. पाककृतीमध्ये बदल झाला असून, तेलाऐवजी साखर दिली जात आहे. गहू व मसूरडाळीच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसारच पोषण आहाराचे वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्यांना पोषण आहार दर दोन महिन्यानी वितरित करण्यात येत आहे.
- योगेश जवादे,
जिल्हा कार्यक्रमाधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.
शासनाकडून पोषण आहार देण्यात येत असून, त्यामध्ये आता तेलाऐवजी साखर देण्यात येत आहे. वास्तविक साखर रद्द करून तेल दिले तर योग्य राहील. तेलाचे दर भडकलेले असताना पोषण आहार पाण्यात शिजविला तरी फोडणी कशाची द्यावी हा प्रश्न आहे.
- ऋतुजा चाळके, लाभार्थी
दोन महिन्यांतून एकदा पोषण आहारातील डाळी, कडधान्य, धान्यांचे वितरण केले जाते. बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यातच तेल देण्याऐवजी साखर दिली जात आहे. वास्तविक तेलाला साखर हा पर्याय अयोग्य आहे. याबाबत शासनाने विचार करणे आवश्यक आहे.
- गायत्री पाटील, लाभार्थी
अंगणवाडी गेले दीड वर्ष बंद असल्यामुळे पोषण आहारासाठी धान्य देण्यात येते. तेल न देता साखर देण्यात येत असली तरी वरणाला साखरेची फोडणी देता येत नाही. तेलाचे दर आधीच कडाडलेले आहेत. त्यामुळे पोषण आहाराला पाण्याची फोडणी द्यावी का?
- दीपाली रामाणी, पालक