बारसू प्रकल्पग्रस्तांशी सरकारचा संवाद सुरू; तज्ञांची विशेष टीम बैठकीला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 10:04 AM2023-04-28T10:04:25+5:302023-04-28T10:05:21+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी केली स्थानिकांशी चर्चा
विनोद पवार
राजापूर (जि. रत्नागिरी) : बारसू रिफायनरीवरून राजकीय रणकंदन सुरू असतानाच आता सरकारने स्थानिकांशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यानी राजापुरात प्रकल्प समर्थक आणि विरोधक अशी दोघांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
प्रकल्प विरोधकांच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी तज्ञांच्या उपस्थितीत ही बैठक सिंग यांनी आयोजित केली होती. दिल्ली, मुंबई येथील एक तज्ञांची विशेष टीम बैठकीला उपस्थित होती.
नाणारला प्रस्तावित रिफायनरी ६० एम. एम. टी. पी. ए. क्षमतेची होती. बारसू येथे २० एम. एम. टी.पी.ए. होणार आहे. त्यामुळे बारसू आणि नाणार अशी ६० एम. एम. टी. पी. ए. रिफायनरी उभारावी अशी मागणी प्रकल्प समर्थक अविनाश महाजन यांनी केली. दरम्यान, बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर हा प्रकल्प पूर्वनियोजित जागी म्हणजे नाणार परिसरात व्हावा, अशी मागणी नाणार परिसरातील शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच शासनाकडे ८ हजार ५०० हजार एकर जमिनी प्रकल्पासाठी देण्याची संमतीपत्रेही सादर केली आहेत, ज्यांचा विरोध आहे, अशी गावे वगळून उर्वरित गावात हा प्रकल्प करावा, अशी अपेक्षाही स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. बारसूमध्ये प्रकल्प नेताना त्याचा आवाका कमी केला आहे. तो आधी ठरवलेल्या जागेतच करावा अशी मागणी आहे.
कोकणचा कायापालट करणारा रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात व्हावा, यासाठी आम्ही २०१९च्या दरम्यान शासनाकडे आमच्या साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे सादर केलेली आहेत. आता जर बारसू परिसरात या प्रकल्पाला विरोध असेल तर शासनाने आमच्या साडेआठ हजार एकर जमिनी ताब्यात घ्यावात व रिफायनरी प्रकल्प मूळ नियाेजित परिसरातच करावा.
- प्रल्हाद तावडे, विलये दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती, शेतकरी व सदस्य.
बारसू असेल वा नाणार; तो भाग वगळून देवगड व राजापूरचा भाग असेल तिथे हा प्रकल्प होणार असून तो थांबविण्याची कुणात ताकद नाही.
- नितेश राणे, आमदार