Government Employees Strike : रत्नागिरी जिल्ह्यात १८ हजार कर्मचारी संपात, प्राथमिक शाळांचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 04:49 PM2018-08-07T16:49:55+5:302018-08-07T16:52:42+5:30
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्याच दिवशी सर्व कार्यालयांमधील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याने शासकीय कार्यालयांच्या कामावर चांगलाच परिणाम झाला आहे.
रत्नागिरी : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्याच दिवशी सर्व कार्यालयांमधील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील १८ हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याने शासकीय कार्यालयांच्या कामावर चांगलाच परिणाम झाला आहे. रूग्णालयांमधील कामकाज मात्र सुरळीत सुरू आहे. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ संपात सहभागी नसल्याने तेथील कर्मचारीही कामावर हजर आहेत.
विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला असून, आज मंगळवारी पहिल्या दिवशी सर्व कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले. प्राथमिक शिक्षक संपामध्ये सहभागी झाले असल्याने मराठी शाळांचे कामकाज पूर्णपणे बंद होते. मात्र माध्यमिक शिक्षक संपात सहभागी नसल्यामुळे हायस्कूल्समधील कामकाज नियमित सुरू होते. विनाअनुदानित शाळांचे कामकाजही नियमित सुरू होते.
जिल्हा रूग्णालयात मुळातच कर्मचाऱ्यांची असंख्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रूग्णालयाचे कामकाज नियमित सुरू आहे. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने संपात सहभाग न घेतल्याने जिल्हा परिषदेचे कामकाजही नियमित सुरू होते.