विनाअडचण गणेशाेत्सव साजरा करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:37 AM2021-09-09T04:37:48+5:302021-09-09T04:37:48+5:30
रत्नागिरी : शहरामध्ये गणेशोत्सव विनाअडचण साजरा व्हावा, यासाठी सर्वच खात्यांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दलासह रत्नागिरीतील अन्य ...
रत्नागिरी : शहरामध्ये गणेशोत्सव विनाअडचण साजरा व्हावा, यासाठी सर्वच खात्यांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दलासह रत्नागिरीतील अन्य शासकीय कार्यालयांची एकत्रित बैठक मंगळवारी उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी प्रत्येक खात्याला त्यांची जबाबदारी नेमून देण्यात आली. वाघमारे यांनी संबंधित खात्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
यावेळी नगर परिषद खात्यातील अधिकारी यांना शहरातील रस्ते, मुख्य रस्त्यावरील विद्युत खांबावरील वीज सुरू असणे, विद्युत वाहिनीवरील फांद्या तोडणे, अनावश्यक फेरीवाल्यांचे नियोजन करणे याबाबत सूचना केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांना विद्युत पुरवठा गणेशोत्सवाच्या काळात सुरळीत राहावा, अत्यावश्यक नंबर देऊन ठेवणे, जेणेकरून कुठेही काही अडचण आली, तर तत्काळ संपर्क करता येईल. एसटी चालकांना व वाहकांना योग्य त्या सूचना देणे, सूचनांचे तंतोतंत पालन करणे, रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना एस.टी. बसमधून घेऊन जाण्यासाठीचे योग्य नियोजन करावे व रेल्वे स्थानकावर एस.टी.कडून माहिती केंद्र उभारावे, अशी सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली. रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांचे योग्य नियोजन करावे, ज्या प्रवाशांकडे तिकीट असेल अशाच प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर पाठवावे, त्यांना सोडायला आलेल्या नातेवाईकांना पाठवू नये. जेणेकरून कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले.
या बैठकीला रिक्षा संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.
या बैठकीमध्ये वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी, दोन दिवस राम आळीतून वाहतुकीसाठी बंद असेल, असे सांगितले. या बैठकीला शहर पोलीस निरीक्षक विनित चौधरी, उपप्रादेशिक परिवहन खात्याचे संतोष काटकर, रेल्वे प्रशासनाचे अजित मधाले उपस्थित होते.