बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती
By मनोज मुळ्ये | Published: April 29, 2023 05:40 PM2023-04-29T17:40:38+5:302023-04-29T17:41:26+5:30
खासदार विनायक राऊत यांनी केला होता गौप्यस्फोट
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प क्षेत्रात सरकारी अधिकाऱ्यांनी जागा घेतल्या आहेत का, त्या कशा घेतल्या आहेत, याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली असून, दोन दिवसात ही चौकशी केली जाईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ज्यांनी १३७ गुंठे जमीन घेतल्याचा आक्षेप घेतला जात आहे, त्या महावितरणच्या अभियंत्याची बदली आपण मुंबईला मुख्यालयात केल्याचेही त्यांनी सांगितले.
शनिवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्तावित रिफायनरीबाबत आढावा बैठक झाली. आंदोलक ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत आपण तातडीने मुंबईहून रत्नागिरीत आल्याचे आणि ही बैठक बोलावल्याचे मंत्री सामंत यांनी संगितले. या बैठकीला खासदार विनायक राऊत, पोलिस महासंचालक प्रमोद पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अजित यशवंतराव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
रिफायनरी प्रकल्पविरोधी संघटनांना चर्चा करावयाची असल्याने ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र काहींना कमी कालावधीमुळे बैठकीला येणे शक्य नव्हते. काहींना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पविरोधी संघटनांचे नेते येथे उपस्थित नव्हते. त्यांच्याशी आपण दूरध्वनीवरुन चर्चा केली. ही बैठक जिल्ह्याच्या बाहेर घेण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता ही बैठक २ किंवा ३ मे रोजी मुंबईत होणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
चर्चेसाठी शासनाने एक पाऊल पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आता शासनाने चार पावले पुढे टाकली आहेत. आंदोलकांवर ३५३ कलम (जबरी मारहाण) लावण्यात येणार असल्याची शंका खासदार विनायक राऊत यांनी मांडली आणि ते मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. मात्र हे कलम लावण्यात येणार नसल्याचे सामंत यांनी सांगितले.
बारसू भागामध्ये प्रकल्प येणार म्हणून काही जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार झाले आहेत. त्यात शासकीय अधिकारी पुढे आहेत, असे खासदार राऊत यांनी बैठकीत सांगितले. त्याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेण्यात आली आहे. कोणीकोणी प्रमाणाबाहेर जागा घेतल्या आहेत, त्या कशा घेतल्या आहेत, याची चौकशी ही समिती दाेन दिवसात करेल. अवैध पद्धतीने ही जागा घेण्यात आली असेल तर अशा अधिकाऱ्याला निलंबितची कारवाई सरकारकडून केली जाईल, असेही सामंत म्हणाले.
महावितरणमधील अभियंत्याची तडकाफडकी बदली
महावितरणच्या राजापूर येथील अभियंता डोंगरे याच्या नावावरच १३७ गुंठे जागा बारसू परिसरात आहे. त्याची तातडीने मुंबई मुख्यालयात बदली करण्यात आली आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण
आवश्यकता असेल तर या प्रकल्पाबाबतची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही याबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करतील. त्यासाठी ते किंवा कोकण आयुक्त ठाकरे यांच्याशी बोलतील आणि त्यांच्यासमोर याचे सादरीकरण केले जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन आपण हा निर्णय घेतला असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.
शरद पवार यांना दिली माहिती
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना एकूणच घडामोडींबाबत जिल्हाधिकरी यांनी माहिती दिली आहे. इतर कोणत्याही पक्षांना याबाबतची माहिती हवी असेल तर त्यांनाही ती दिली जाईल. त्यांच्या मनातील गैरसमज दूर केले जातील, असे मंत्री सामंत म्हणाले.