आपद्ग्रस्तांसाठी शासनाकडून ४४ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:36 AM2021-09-23T04:36:23+5:302021-09-23T04:36:23+5:30
रत्नागिरी : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना यापूर्वी तात्कालीक मदत म्हणून २ कोटी ६४ ...
रत्नागिरी : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना यापूर्वी तात्कालीक मदत म्हणून २ कोटी ६४ लाख ३३ हजार रुपये निधी देण्यात आला आहे. २१ सप्टेंबर २०२१ च्या आदेशान्वये ४४ कोटी २९ लाख १७ हजार रुपये निधी प्राप्त झाला असून, एकूण ४६ कोटी ९३ लाख ५० हजार रुपये एवढा निधी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. भाडी/कपडे व घरगुती वस्तूंसाठी सानुग्रह अनुदान, मृत जनावरांसाठी मदत, पूर्णत: नष्ट/अंशत: पडझड झालेली कच्ची/पक्की घरे, झोपडी, गोठे, मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी अर्थसाहाय्य, मत्स्यबीज शेतीसाठी अर्थसाहाय्य, दुकानदार व कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत, शेत जमिनीसाठी मदत व इतर अनुज्ञेय बाबींकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) व राज्य शासनाचा निधी (State Fund) अंतर्गत निधीची मागणी करण्यात आली होती. विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी २६ जुलै २०२१ रोजीच्या आदेशान्वये मृत व्यक्ती, भांडी/कपडे व घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी उणे प्राधिकार पत्राने अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली होती तसेच विभागीय आयुक्त कोकण विभाग यांच्या ९ ऑगस्ट २०२१ रोजीच्या आदेशान्वये, भांडी/कपडे व घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी २ कोटी ६४ लाख ३३ हजार रुपये निधी प्राप्त झाला व त्यानुसार, बाधितांना निधी वाटपाची कार्यवाही यापूर्वीच करण्यात आली आहे.
बाधित नागरिकांना निधीचे वाटप तहसीलदारांमार्फत करण्यात येत असून संबंधित तालुक्यांना त्यांच्या मागणीनुसार निधीचे वितरण करण्यात आले आहे. निधी वाटपाची कार्यवाही सर्व पात्र बाधितांना तत्काळ करण्याबाबत तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत.
.......
नुकसान झालेल्या सर्व बाबींसाठी शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्या १६ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य आपती प्रतिसाद निधीमधून ७ कोटी ४८ लाख ५ हजार रुपये व राज्य शासन निधीमधून ३६ कोटी ८१ लाख १२ हजार रुपये असे एकूण ४४ कोटी २९ लाख १७ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
..........
- कपडे तसेच घरगुती भांडी वस्तूंकरिता : ७ कोटी ३२ लाख ९० हजार रुपये (यात यापूर्वीच्या २ कोटी ६४ लाख ३३ हजार रुपये मदत रकमेचा समावेश आहे.)
- मृत जनावरांसाठी मदत : २ कोटी ९० लाख ८८ हजार रुपये
- नुकसानग्रस्त घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्यांसाठी : ७ कोटी ६४ लाख ७२ हजार
- मत्स्यव्यवसायासाठी मदत : २ लाख २३ हजार
- हस्तकला/हातमाग कारागीर, बारा बलुतेदार यांना मदत : १४ लाख १ हजार
- शेतजमिनीचे नुकसान २ कोटी ३६ लाख
- दुकानदारांना मदत : २५ कोटी ५५ लाख ५६ हजार
- टपरीधारकांना मदत : ९६ लाख ६० हजार
- कुक्कुटशेडचे नुकसान : ६० हजार