मच्छीमारांना सरकारने पॅकेज द्यावे : महेंद्र चाैगुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:13+5:302021-05-21T04:32:13+5:30
दापोली : तालुक्यातील मच्छीमारांना निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच ताैक्ते वादळाचा मोठा फटका बसला आहे. ऐन हंगामातच मासेमारी बोटी किनाऱ्यावर घेण्याची ...
दापोली : तालुक्यातील मच्छीमारांना निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच ताैक्ते वादळाचा मोठा फटका बसला आहे. ऐन हंगामातच मासेमारी बोटी किनाऱ्यावर घेण्याची वेळ आल्याने मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या कोकणातील मच्छीमारांना सरकारने पॅकेज द्यावे, अशी मागणी दापाेलीतील मच्छीमार नेते महेंद्र चौगुले यांनी केली आहे़
प्रसारमाध्यमांशी बाेलताना महेंद्र चाैगुले यांनी मच्छीमारांच्या व्यथा मांडल्या. ते म्हणाले की, कोकण किनारपट्टीला ताैक्ते वादळाचा जोरदार परिणाम झाला आहे. या वादळामुळे मच्छीमारी बोटींचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन हंगामातच चक्रीवादळामुळे बोटी किनाऱ्यावर आणण्याची वेळ आल्यामुळे बोटी किनाऱ्यावर नांगर टाकून उभ्या आहेत. मासेमारी बंदीकाळातील पुढील दोन महिने जीवन जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. १० मे ते ३० मेपर्यंत करण्यात येणाऱ्या मासेमारीच्या जोरावर मच्छीमारांचे बंदी काळातले जेमतेम दोन महिने सुखरूप जातात. परंतु, यावर्षी ऐन हंगामातच बाेटी किनाऱ्यावर आल्याने मच्छीमार बांधव संकटात सापडल्याचे चाैगुले यांनी सांगितले़
त्यांनी पुढे सांगितले की, मासेमारी हंगामाच्या अंतिम टप्प्यात चक्रीवादळाचा मोठा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला आहे. तर, दुसरीकडे या वादळाचा मासेमारी बोटींना चांगलाच फटका बसला आहे़ वारंवार येणाऱ्या चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होत आहे़ मच्छीमारांना आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सरकारने आर्थिक आधार देणे गरजेचे असल्याचे चाैगुले यांनी सांगितले़