घराच्या स्वप्नाला आता सरकारचा हातभार, मुद्रांक शुल्कात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 07:51 PM2020-10-22T19:51:38+5:302020-10-22T19:57:00+5:30
home, tax, ratnagiri यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाचा शिरकाव झाला. देशात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले आणि पुढचे दोन महिने सर्वच व्यवहार, उद्योगधंदे बंद राहिले. याचा सर्वाधिक फटका महसूल मिळवून देणाऱ्या दस्त नोंदणी कार्यालयाला बसला.
शोभना कांबळे
रत्नागिरी : यावर्षी जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाचा शिरकाव झाला. देशात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले आणि पुढचे दोन महिने सर्वच व्यवहार, उद्योगधंदे बंद राहिले. याचा सर्वाधिक फटका महसूल मिळवून देणाऱ्या दस्त नोंदणी कार्यालयाला बसला.
महिनाभर हे कार्यालय बंद राहिले. मे महिन्यात लॉकडाऊन काहीअंशी शिथील झाले. त्यामुळे पुन्हा मालमत्ता खरेदी - विक्रीला सुरुवात झाली. त्यामुळे दस्त नोंदणी सुरू झाली. मात्र, लोकांमध्ये कोरोनाची भीती असल्याने म्हणावे तशी गती मिळाली नाही. मात्र, राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात केलेल्या मुद्रांक शुल्क कपातीमुळे आता दसरा दिवाळीत घरखरेदी उच्चांकी होण्याची चिन्हे आहेत.
सरकारने यावर्षी मुद्रांक शुल्कात कपात करताच सप्टेंबर महिन्यात १,७७९ दस्तऐवजाची नोंदणी झाली असून, या महिन्यात ४ कोटी १८ लाख ६९ हजार ४१५ रुपयांचा महसूल मिळाला आहे. गतवर्षी याच महिन्यात १,४०२ दस्त नोंदणी झाली होती. व्यवहार कमी झाले असले तरी मुद्रांक शुल्क सहा टक्के असल्याने त्यातून ४ कोटी ८५ लाख २८ हजार १२ रुपये इतका महसूल मिळाला होता. म्हणजेच ६६ लाख ५८ हजार ५९७ एवढा महसूल अधिक मिळाला होता. मुद्रांक शुल्क कपातीमुळे मध्यमवर्गियांना अधिक दिलासा मिळाला असून, दसरा - दिवाळीत घर खरेदीला अधिक गती येणार आहे.
स्टॅम्प ड्युटी कमी केल्याचा परिणाम
सरकारने स्टँप ड्युटी कमी केल्याने आता मध्यमवर्गियांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मात्र, या निर्णयामुळे शासनाचा महसूल तीन टक्क्यांनी कमी होणार आहे. ३ टक्के मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय डिसेंबरपर्यत जाहीर करण्यात आला आहे.
मुद्रांक शुल्क कपातीमुळे शासनाच्या महसुलाला कात्री
मुद्रांक शुल्कात ३ टक्के कपात झाल्याने आता फ्लॅट किंवा घर खरेदीला सप्टेंबर महिन्यात वेग आला आहे. मात्र, अजूनही मुंबई - ठाणे येथून येणाऱ्यांचे प्रमाण यावर्षी कमी आहे. मुद्रांक शुल्क कपातीमुळे शासनाच्या महसुलात निम्म्याने कपात होणार आहे. मात्र, कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने सामान्य माणसांसाठी हा निर्णय घेतला आहे.
- वाय. बी. जंगम,
सह जिल्हा निबंधक, रत्नागिरी
जीएसटी कमी, व्याज कमी
मुद्रांक शुल्क कपातीबरोबरच जीएसटी करही कमी झाला आहे. बँकांनीही कर्जाचे व्याज दर कमी केल्याने दसऱ्याला घर खरेदीला वेग येणार आहे.
- नित्यांनद भुते, बांधकाम व्यावसायिक
घर घेणाऱ्यांना दिलासा
सरकारने मुद्रांक शुल्क तीन टक्के कमी केल्याने घर घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता लोक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहेत.
- प्रवीण लाड, बांधकाम व्यावसायिक