शासनाचे नवे अभियान :
By admin | Published: July 16, 2014 11:02 PM2014-07-16T23:02:18+5:302014-07-16T23:05:18+5:30
पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठवणार
रहिम दलाल -रत्नागिरी
ग्रामीण भागामध्ये पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब साठवून पाणीटंचाईवर मात करण्यात येईल. याकरिता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘पाणी साठवा गाव वाचवा’ अभियान जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे़
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ योग्य तंत्रज्ञान वापरून नियोजनपूर्वक पावसाचे पाणी अडवल्यास त्याचा मोठा फायदा ग्रामीण भागातील जनतेला होणार आहे़ पाणी साठवण व त्याचा भविष्यातील समान वापर तंत्रशुध्द पध्दतीने केल्यास जिल्ह्याला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही़ सन २०१३च्या उन्हाळ्यामध्ये १२३ गावांतील २७७ वाड्यांमध्ये, तर सन २०१४ मध्ये १२२ गावातील २९० वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते़ दोन्ही वर्षी टंचाईग्रस्तांना २८ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.
पाणी पुरवठ्यासाठी विविध नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत़ तरीही पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवते़ त्यासाठी ग्रामीण भागातील पावसाचे पाणी कसे साठविता येईल, यासंदर्भात विचार करुन ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे़ त्यामध्ये शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ प्राप्त करुन घेण्यासाठी गावपातळीवर सनियंत्रण व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे़
गावातील विहिरी, तलावांमधील पाण्याच्या पातळीची मोजणी करणे, पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची स्थिती निश्चित करणे, पाणीटंचाईसाठी वापरण्यात येणाऱ्या टँकरची संख्या, मागील पाच वर्षात टँकरवर झालेला खर्च, पाणी टंचाईमुळे कृषी उत्पादनात झालेली घट, पाणीटंचाईमुळे साथरोगाचे प्रमाण, माता-बाल मृत्यूचे प्रमाण, कुपोषणाचे प्रमाण आदिंची माहिती घेणे, ग्रामपंचायत क्षेत्रातील भूगर्भाचा अभ्यास करुन त्याअनुषंगाने पाणी साठवण्याचा, पाणी वापराचा नियोजन आराखडा तयार करुन व त्याची अंमलबजावणी करणे, त्यानुसार ग्रामीण भागातील क्षेत्रातील भूजल पातळीचे भूजल सर्वेक्षण करणे ही कामे गावपातळीवर करण्यात येणार आहेत़
या कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतीने विकास यंत्रणेमार्फत मे महिन्यातच भूजल पातळीचे परीक्षण करायचे आहे़ ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये पाच वेगवेगळ्या ठिकाणी पर्जन्यमापक बसवून सर्वसाधारण नोंद घ्यायची आहे़ तसेच पाणी साठवण्यासाठी कामांचे नियोजन व अंदाजपत्रक तयार करणे, पाणी आराखडा, अंदाजपत्रकामध्ये गावच्या हद्दीतील सर्व सिंचनाचे उद्भव, पिण्याच्या पाण्याचे उद्भव यासाठी पुनर्भरणाचा आराखडा ग्रामपंचायतीनीच तयार करायचा आहे़ हे अभियान लवकरच जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे़ मात्र, दरवर्षी उन्हाळ्यामध्ये टंचाई भेडसावणाऱ्या ग्रामपंचायतींना प्राधान्य देण्यात येणार आहे़
तंत्रशुध्द पध्दतीने वॉटर अकाऊंट तयार करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी, शासकीय, निमशासकीय आणि खासगी इमारतींवर रेनरुफ वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर बांधून घेण्यासाठी ग्रामपंचायतींनी प्रत्येक कुटुंबप्रमुख आणि स्वयंसहाय्यता गटातील महिलांना प्रवृत्त करुन इमारतीवर पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब मुरविणे आवश्यक आहे़ असे झाल्यास पाण्याचा प्रत्येक थेंब हा वापरात येईल. मात्र त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
नादुरुस्त जुने पाझर तलाव, गावतळी, शेततळी, लघुसिंचन प्रकल्प यांची लोकसहभागातून दुरूस्ती करण्यात येणार आहे़ या तलावांमध्ये साठलेला गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यात येणार आहे़
हे अभियान राबवण्यापूर्वी भूगर्भातील पाण्याची सर्वसाधारण पातळी निश्चित करुन अभियान पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात भूजल पातळीमध्ये वाढ किंवा घट तांत्रिक अधिकाऱ्यांकडून तपासून घेण्यात येणार आहे़