नगराध्यक्षांनी ठणकावले; व्यापारीही ठाम

By admin | Published: October 31, 2014 12:26 AM2014-10-31T00:26:15+5:302014-10-31T00:30:26+5:30

पालिका-व्यापारी वाद : राजापूरचा आठवडा बाजार बंद

The Governor! Businessman too | नगराध्यक्षांनी ठणकावले; व्यापारीही ठाम

नगराध्यक्षांनी ठणकावले; व्यापारीही ठाम

Next

राजापूर : कोणतीही पूर्वकल्पना न देता नगरपरिषद प्रशासनाने राजापुरातील आठवडा बाजाराची नियमित जागा बदलल्याने संतापलेल्या बाजारातील व्यापाऱ्यांनी त्या जागी बसण्यास नकार दिल्याने गुरवारी नेहमीप्रमाणे आठवडा बाजार भरला नव्हता. व्यापाऱ्यांनी पूर्वीच्याच ठिकाणी पुन्हा बाजार भरवला जावा, अशी मागणी रेटून धरली असतानाच दुसरीकडे नगर परिषदेनेही चांगलेच ताणून धरले आहे. आठवडा बाजाराची पूर्वीची जागा अडथळा ठरत होती म्हणून बदलली व जागा कुठली द्यायची, हा नगर परिषद कौन्सिलचा विषय आहे. बाजारातील व्यापारी ते ठरवू शकत नाहीत, असे नगराध्यक्ष मुमताज काझी यांनी ठणकावून सांगितले.
अनेक वर्षांनंतर राजापुरातील आठवडा बाजाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दर गुरुवारी राजापुरात आठवडा बाजार भरतो. यापूर्वी तो कोदवली नदीपात्रात भरत होता. त्यानंतर या जागेवर महसूल प्रशासनाने अधिकार सांगितल्याने शहरातील गणेश विसर्जन घाट ते सध्याचे मच्छीमार्केट यादरम्यान तो भरु लागला.
याठिकाणी दहा वर्षे हा बाजारा सुरु आहे. अलिकडे राजापूर पालिका प्रशासनाने कोणतीच पूर्वकल्पना न देता बाजाराच्या ठिकाणात बदल करुन अर्जुना नदीच्या पात्रालगत जेथे डंपिंग करुन गाळ ठेवण्यात आला आहे, त्या ठिकाणी भरविण्यास सुरुवात केली. त्यामुळे व्यापाऱ्यांचे पित्त चांगलेच खवळले आहे. नगर परिषदेने दिलेली जागा ही पुरेशी नाही व धोकादायक आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे राजापुरात दाखल झालेल्या व्यापाऱ्यांना पूर्वीच्या जागी बसण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे संतापलेल्या काही व्यापारी व प्रशासनात शाब्दीक चकमक उडाली. व्यापारी व प्रशासन हे दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते. बाजाराचे ठिकाण ठरविण्याचा अधिकार हा आमचा असून, तो आठवडा बाजारातील व्यापारी ठरवू शकत नाहीत, असे पालिकेने ठणकावून सांगितले आहे.
त्यानंतर कडधान्य व्यापाऱ्यांनी बाजारात बसण्यास नकार दिला. त्यांना मच्छी व्यावसायिकांनी साथ दिली. नंतर काही व्यापारी बाजारातून निघून गेले. त्यामुळे भरलेल्या आठवडा बाजारात काही व्यापारीच उपस्थित होते.
जागेत झालेल्या बदलामुळे हे व्यापारी आपली कैफीयत जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडण्याच्या पवित्र्यात आहेत. त्याबाबत राजापूरच्या नगराध्यक्ष मुमताज काझी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आठवडा बाजाराची जागा बदलण्याचा निर्णय पालिकेचा आहे. राजापुरात मुबलक जागा उपलब्ध नाही. त्यामुळे रहदारीच्या मार्गावरच आठवडा बाजार भरत असे. त्याचा फटका वाहतुकीसह स्थानिक व्यापाऱ्यांना होत होता. परगावाहून येणारी मालवाहतूक गुरुवारी आठवडा बाजार व शुक्रवारी राजापूर शहर बंद असल्याने रखडून राहात होती. या अडचणीमुळे आठवडा बाजाराच्या जागेत बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काझी यांनी
दिली.
आठवडा बाजारात नाशवंत मालाचीच विक्री केली जाते. अलिकडच्या काळात या बाजारात सर्वच प्रकारच्या मालाची विक्री होत असून, बाजारातील व्यापारी जर नियमाप्रमाणे जाणार असतील तर आम्हीही कायद्यावरच बोट ठेवून जाऊ, असा इशारा नगराध्यक्ष काझी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी दिला आहे. त्यामुळे राजापूरच्या आठवडा बाजाराचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
४नगरपरिषद प्रशासनाने राजापुरातील आठवडा बाजाराची नियमित जागा बदलल्याने व्यापारी संतप्त.
४आठवडा बाजाराची जागा ठरवण्याचा अधिकार व्यापाऱ्यांचा नाही, पालिकेचा : नगराध्यक्षा.
४....तर आम्हीही कायद्यावर बोट ठेवू : नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी दिला इशारा.
४जुन्या ठिकाणांमुळे शहरातील मालवाहतूक रखडत असल्याचे राजापूर नगर पालिकेचे म्हणणे.

Web Title: The Governor! Businessman too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.