रत्नागिरीत उपक्रमाचे कौतुक, जिद्दी, रत्नदुर्ग माऊंटेनिअर्समुळे गोविंदा सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 03:42 PM2018-09-05T15:42:22+5:302018-09-05T15:50:45+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दहीहंडीत सहभागी होणाऱ्या सर्वांत वरच्या थरातील गोविंदाला बॉडी हार्नेस, हेल्मेट आणि रोपच्या सहाय्याने सुरक्षितता प्रदान करण्याची जबाबदारी गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स तसेच जिद्दी माऊंटेनिअरिंग या दोन संस्थांनी हाती घेतली होती. ती यशस्वीही करून दाखविली.
रत्नागिरी : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दहीहंडीत सहभागी होणाऱ्या सर्वांत वरच्या थरातील गोविंदाला बॉडी हार्नेस, हेल्मेट आणि रोपच्या सहाय्याने सुरक्षितता प्रदान करण्याची जबाबदारी गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स तसेच जिद्दी माऊंटेनिअरिंग या दोन संस्थांनी हाती घेतली होती. ती यशस्वीही करून दाखविली.
कोकणात दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांना गिर्यारोहणाच्या साधन सामग्री अर्थात बॉडी हार्नेस, हेल्मेट आणि रोपच्या सहाय्याने प्रथमच १०० टक्के सुरक्षा व संरक्षण देण्याचा प्रयत्न जिद्दी तसेच रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या कार्यकर्त्यांनी केला.
न्यायालयाने दहीहंडी उत्सवाला जे साहसी खेळाचे नाव दिले आहे, त्या गोष्टीचं तंतोतंत पालन करत या संस्थांनी गोविंदाना सुरक्षा प्रदान केली. पाचपेक्षा अधिक थर असलेल्या ठिकाणी वरच्या थरावर असलेल्या गोविंदासाठी ही सुरक्षितता असल्याने दहीहंडीचा आनंद अधिक द्विगुणित झाला.
आमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत सोमवारी शहरातील मांडवी समुद्रकिनाऱ्यावर शिवसेना पुरस्कृत श्री प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमात जिद्दीची पूर्ण टीम आलेल्या सर्व वरच्या थरावर चढणाऱ्या गोविंदांना योग्य त्या प्रकारे संरक्षण देण्यासाठी पूर्णपणे यशस्वी झाली. या ठिकाणी पाच थरावर हंडी बांधण्यात आली होती. गोविंदाना सुरक्षा कवच मिळाल्याने येथील दहीहंडी अतिशय जोशपूर्ण वातावरणात पार पडली.
तसेच साळवी स्टॉप येथील रत्नागिरी जिल्हा मोटार मालक असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमातही जबाबदारी रत्नदुर्ग टीमने पार पाडली. येथील दहीहंडीत सहभागी होणाऱ्या सर्वांत वरच्या थरातील गोविंदाला ह्यबॉडी हार्नेसह्ण, हेल्मेट आणि रोपच्या सहाय्याने सुरक्षित केल्याने गोविंदानी अधिक उत्साहाने भाग घेतला.
गोविंदांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न
अनेक ठिकाणी उंचावरील दहीहंडी फोडणाऱ्या गोविंद पथकांना लाखो रूपयांचे बक्षीस लावले जाते. बक्षिसाच्या आकर्षणापोटी अनेक गोविंदा धोका पत्करून हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही वेळा त्यांना जीवघेणा अपघात घडतो. अनेक गोविंदा यात जायबंदी झालेले आहेत. या कार्यक्रमाचा आनंद टिकून राहावा, तसेच वरच्या थरावरील गोविंदाला सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.