शासनाने आंबा बागायतदारांना कर्ज माफी द्या; बागायतदारांचं मुख्यमंत्र्यांना साकडे
By मेहरून नाकाडे | Published: May 23, 2023 03:04 PM2023-05-23T15:04:50+5:302023-05-23T15:06:13+5:30
२०१५ साली शासनाने कर्ज पुर्नगठण करून व्याजाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ती रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा झालेली नाही.
रत्नागिरी : यावर्षी आंबा उत्पादन अल्प आहे. आलेल्या उत्पादनातून कीटनाशकांची बिले, मजूरांचे पैसे भागविणेसुध्दा शक्य नाही. बँकांची कर्जपरतफेड करू शकणार नाहीत. बागायतदार आर्थिक संकटात असून शासनाने बागायतदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी समस्त आंबा बागायतदारांतर्फे करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत येत आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेवून बागायतदारांच्या व्यथा मांडणार असल्याची माहिती पावस आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत उपस्थित होते. ‘फयान’ वादळानंतर जिल्ह्याच्या आंबा उत्पादकतेत दिवसेंदिवस घटच होत चालली आहे. यावर्षी तर आंबा उत्पादन फारच कमी आहे. त्यामुळे शासनाने यावर्षी आंबा बागायतदारांसाठी मदत करणे गरजेचे आहे. अन्यथा बागायदार पुढील वर्षीच्या हंगामासाठी उभा राहू शकणार नाही.
२०१५ साली शासनाने कर्ज पुर्नगठण करून व्याजाची रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप ती रक्कम बागायतदारांच्या खात्यावर जमा झालेली नाही. यावर्षी तर पीक कर्ज परतफेड कशी करावी, असा बागायदारांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समस्त बागायतदारांची व्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून मांडणार आहोत. मुख्यमंत्री शिंदे यांनी बागायदारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे.