ग्रामपंचायत पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:33 AM2021-08-27T04:33:42+5:302021-08-27T04:33:42+5:30
पाचल : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत तालुक्यात तळवडे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला होता. या पुरस्काराचे वितरण राजापूर पंचायत समिती ...
पाचल : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत तालुक्यात तळवडे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला होता. या पुरस्काराचे वितरण राजापूर पंचायत समिती सभागृहात करण्यात आले. आमदार राजन साळवी यांच्याहस्ते सरपंच संदीप प्रभुदेसाई, उपसरपंच चंद्रकांत गुरव व ग्रामसेवक संतोष चव्हाण यांच्याकडे हा पुरस्कार सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला. ग्रामीण भागातील उत्कृष्ट घरकुल यासाठी भागिर्थी पांचाळ यांना सन्मानित करण्यात आले.
बौध्दजन मंडळाची मदत
खेड: शहरासह ग्रामीण भागातील पूरग्रस्त १५ कुटुंबीयांना बौध्दजन ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून आमदार योगेश कदम यांच्याहस्ते प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मुंबई-भोमडी येथील पदाधिकाऱ्यांनी ७५ हजार रुपयांचा निधी गोळा केला. त्यानंतर ही मदत देण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुशील घाडगे, शाखा अभियंता राहुल घाडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मदतकर्त्यांचा सत्कार
खेड : महापुरात कासारआळी येथील तरुणांनी जिवाची पर्वा न करता अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढून सुरक्षितस्थळी आणण्यासाठी मोठी कामगिरी बजावणाऱ्या समाजातील मदतकर्त्या तरुणांचा श्री महाकाली महिला मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. महापुरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. अनेकांनी डोक्यावरील छप्पर गमावले. अशावेळी कासारआळी येथील तरुण मदतीसाठी धावून आले. त्यांनी अन्न व पाण्याचीही व्यवस्था केली.
शिष्यवृत्ती परीक्षेत यश
खेड : तालुक्यातील खवटी येथील पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित, न्यू इंग्लिश स्कूल व पी. के. दरेकर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केले. करण झोरे याने जिल्ह्यात पाचवा, तर प्रतीक्षा दळवी हिने ११ वा क्रमांक पटकावला. ओंकार वालणकर, हर्षा यादव हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या संस्थाध्यक्ष भालचंद्र बेलोसे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
पूरग्रस्तांना मदत
खेड : जिल्हा सहकारी ग्रुप, वापी यांच्यावतीने तालुक्यातील बोरघर-आदिवासी पाडा येथील ३५ पूरग्रस्तांना आर्थिक मदतीसह जीवनावश्यक वस्तूंव्दारे मदतीचा हात दिला. साडी, सोलापुरी चादर आदींचे वाटप केले. याप्रसंगी ग्रुपचे सदस्य विनोद कदम, रामनाथ भोसले, विनोद निकम, सचिन वेल्हे, सरपंच धारा बोरकर व अन्य सदस्य उपस्थित होते.
निर्यातीसाठी कृतिदल
रत्नागिरी : कोरोना महामारीत तसेच अतिवृष्टी किंवा दुष्काळासारखे संकट अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. शेतमालाची निर्यात माेठ्या प्रमाणात वाढावी, यासाठी कृषी विभागामार्फत कृतिदल कार्यरत करण्यात आलेले आहे.