Gram Panchayat Election: प्रशासनाची चूक, 'इतके' मतदार मतदानापासून राहणार वंचित; रत्नागिरी जिल्ह्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 01:09 PM2022-12-14T13:09:07+5:302022-12-14T13:19:37+5:30

नाटे येथे सरपंचपदासह सदस्यांच्या ११ जागांसाठी चार प्रभागांत निवडणूक होत आहे

Gram Panchayat Election, Administration mistake, 99 voters in Nate Padwane Wadi of Ratnagiri district will be deprived of voting | Gram Panchayat Election: प्रशासनाची चूक, 'इतके' मतदार मतदानापासून राहणार वंचित; रत्नागिरी जिल्ह्यातील प्रकार

Gram Panchayat Election: प्रशासनाची चूक, 'इतके' मतदार मतदानापासून राहणार वंचित; रत्नागिरी जिल्ह्यातील प्रकार

Next

राजापूर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी चार दिवस शिल्लक राहिलेले असताना प्रशासनाच्या गंभीर चुकीमुळे नाटे ग्रामपंचायतीत पडवणे वाडीतील ९९ मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. नाटे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये समाविष्ट असलेल्या या संपूर्ण वाडीतील मतदारांचा मतदार यादीत समावेशच नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.

या प्रकारामुळे पडवणे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत असून, आमचा मतदानाचा हक्क आम्हाला मिळावा, अशी मागणी या ग्रामस्थांनी राजापूर तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

नाटे येथे सरपंचपदासह सदस्यांच्या ११ जागांसाठी चार प्रभागांत निवडणूक होत आहे. सरपंचपदासाठी पाच उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग एकमधील दोन जागा बिनविरोध झालेल्या असून प्रभाग दोनमधील तीन, तीनमधील तीन व चारमध्ये तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. ९ जागांसाठी आता १९ उमेदवार रिंगणात आहेत.

या ग्रामपंचायतीची प्रारूप मतदार यादी १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर १३ ते १८ या कालावधीत हरकती मागविण्यात आल्या. २१ ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, आता प्रभाग क्रमांक दोनमधील पडवणे वाडीतील ९९ मतदारांचे यादीत नावच नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात येताच मतदार यादीत नाव न आलेल्या या ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन मतदानाचा अधिकार मिळावा, अशी मागणी केली आहे.

मतदारांना कळू न देता नावे वगळणे ही एक प्रकारे फसवणूक झाली आहे. यादी भाग २७७ मध्ये यापूर्वी पडवणे वाडीतील मतदारांची नावे असायची; परंतु आता ती वगळण्यात आली आहेत. तरी आमची नावे प्रभाग २ मधील मतदार यादीमध्ये समाविष्ट करावीत आणि तसे होत नसेल तर प्रभाग २ ची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी. आमची नावे सदर यादीमध्ये समाविष्ट केल्यानंतरच सदरची निवडणूक घेण्यात यावी, तसेच सरपंच पदाची निवडणूकही तशीच घ्यावी. अन्यथा आम्हाला आमच्या मतदानाच्या मूलभूत अधिकारासाठी आंदोलन आणि उपोषण मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर राजेंद्र आंबोळकर, मंगेश पारकर, दिवाकर आंबोळकर, सुगंध ठाकरे, दिगंबर आंबोळकर, प्रकाश आंबोळकर, राजेंद्र मेळेकर, सुबोध आंबोळकर, पूजा आंबोळकर यांच्यासह सुमारे ४० ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

Web Title: Gram Panchayat Election, Administration mistake, 99 voters in Nate Padwane Wadi of Ratnagiri district will be deprived of voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.