ग्रामपंचायत निवडणुका- महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, मनसे सामना रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 06:23 PM2020-12-23T18:23:02+5:302020-12-23T18:24:17+5:30
gram panchayat Election Ratnagiri - रत्नागिरी जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक म्हणजेच ४७९ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारपासून रणसंग्राम सुरू होत आहे. जानेवारीमध्ये मतदान होत असलेल्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अजूनही बहुसंख्य ग्रामपंचायतींमधील उमेदवारांची यादी राजकीय पक्षांनी निश्चित केलेली नाही. तरीही जास्तीत जास्त ग्रामपंचायतींमध्ये निवडणूकच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक म्हणजेच ४७९ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारपासून रणसंग्राम सुरू होत आहे. जानेवारीमध्ये मतदान होत असलेल्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध व्हाव्यात, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अजूनही बहुसंख्य ग्रामपंचायतींमधील उमेदवारांची यादी राजकीय पक्षांनी निश्चित केलेली नाही. तरीही जास्तीत जास्त ग्रामपंचायतींमध्ये निवडणूकच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील एकूण ८४६ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून या काळात संपली आहे, तर ४७१ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर या काळात संपली आहे. त्यामुळे आता एकूण ४७९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. २३ ते ३० डिसेंबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. जिथे गरज आहे तेथे १५ जानेवारीला मतदान घेतले जाणार आहे. १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
राज्यात एकत्र असलेली शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांमध्येही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणाला किती जागा, कोण उमेदवार हे निर्णय स्थानिक पातळीवरच घेतले जाणार आहेत. मात्र, आघाडीचा निर्णय अंतिम झाला आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचवेळी शक्य तेथे मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्नही भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका खेड तालुक्यात होणार आहेत, तर सर्वात कमी निवडणुका मंडणगड तालुक्यात होणार आहेत. सरपंच पदाची आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अनेकजण संभ्रमात आहेत. राजकीय पक्षांनी अजून आपले अधिकृत उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे आतापासून पक्षांतर्गत वादांनी जोर धरला आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
- दिनांक २३ ते ३० डिसेंबर : नामनिर्देशनपत्र दाखल करणे.
- ३१ डिसेंबर : नामनिर्देशनपत्रांची छाननी
- ४ जानेवारी : नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत
- ४ जानेवारी : निवडणूक चिन्ह नेमून देणे तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर करणे
- १५ जानेवारी : सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० मतदान
- १८ जानेवारी : मतमोजणी