प्रकल्पाविरोधात ग्रामपंचायतीची उडी
By admin | Published: January 4, 2017 11:14 PM2017-01-04T23:14:45+5:302017-01-04T23:14:45+5:30
नाणार परिसर : ८० टक्के जमीन सागवे गावातून संपादीत होणार, तहसीलदारांना निवेदन
राजापूर : राजापूर तालुक्यात नाणार परिसरात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध होत असतानाच आता सागवे ग्रुप ग्रामपंचायतीने या प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे. या प्रकल्पासाठी ८० टक्के जमीन ही सागवे गावामधून संपादीत केली जाणार आहे. त्याबाबत शासनाने स्थानिक ग्रामपंचायतीला विश्वासात घेतलेले नाही. शिवाय येणारा प्रकल्प निसर्गावर परिणाम करणारा असल्याने तो तत्काळ रद्द केला जावा, असा एकमुखी ठराव सागवे ग्रामपंचायतीने केला आहे. त्याबाबतचे निवेदन राजापूर तहसीलदारांना देण्यात आले आहे .
नाणार परिसरातील हा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे. या वादात आता ग्रामपंचायतीनेही उडी घेतली आहे. केंद्र शासनाच्या इंडियन आॅईल, हिंंदुस्तान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम यांची ५१ टक्के भागिदारी व महाराष्ट्र शासनाची ४९ टक्के सहभाग असा पेट्रोल रिफायनरिचा सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प नाणार परिसरात येवू घातला आहे त्यातून दरवर्षी ६० दशलक्ष पेट्रोलची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १५ हजार एकर जागा आवश्यक असून, नाणार परिसरातील जागांसह सागवे परिसरातील जागा संपादीत केल्या जाणार आहेत.
या प्रकल्पाचा पर्यावरणावर विपरित परिणाम होईल, अशी धास्ती प्रकल्प परिसरातील जनतेला वाटत आहे. शिवाय अन्य समस्या निर्माण होतील अशा भीतीपोटी नाणारमधील जनतेने येऊ घातलेल्या प्रकल्पाला जोरदार विरोध सुरु केला असतानाच आता सागवे ग्रामपंचायतीने देखील नियोजित प्रकल्पाविरोधात रान उठविण्याचा निर्धार केला आहे. त्या प्रकल्पात जाणाऱ्या जमिनींपैकी सुमारे ८० टक्के जमिनी सागवे गु्रप ग्रामपंचायत क्षेत्रातील जाणार आहेत त्यामध्ये कारिवणे, जंबारी, सागवेखुर्द, कात्रादेवी, कातळी, सागवे, वाडापाल्ये व गोठीवरे या महसुली गावांचा समावेश आहे, असे गावच्या सरपंच लक्ष्मी शिवलकर यांचे म्हणणे आहे आपल्या गावातील जागा निवडताना शासनाने ग्रामपंचायतीशी कोणताच पत्रव्यवहार केलेला नसून, कुठल्याच प्रकारची कल्पनादेखील देण्यात आलेली नाही.
नियोजीत प्रकल्पामुळे सागवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील किनारपट्टी व पर्यावरणाला हानी पोहोचणार असून, या गावापासून ७ ते ८ किलोमीटरवर जैतापूरचा अणुउर्जा प्रकल्प आला आहे .
तालुक्याच्या पश्चिम भागातच पर्यावरणावर परिणाम करणारे असे प्रकल्प येत असून, आमचा त्याला प्रखर विरोध आहे. शासनाने याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. ती देखील आम्हाला मिळाली पाहिजे आणि हा रिफायनरी प्रकल्प सागवे गावच्या हद्दीतून हद्दपार झालाच पाहिजे, अशा मागणीचा ठराव सागवे ग्रामपंचायतीने केला आहे व या ठरावासह एक निवेदन राजापूर तहसीलदारना सोमवारी सरपंच लक्ष्मी शिवलकर यांनी दिले. नाणार पाठोपाठ आता सागवेवासीयांनी प्रकल्पाला विरोध सुरु केल्यामुळे भविष्यात अणुउर्जा प्रकल्पाप्रमाणेच रिफायनरीदेखील संघर्षमय ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (प्रतिनिधी)